
तन्वी सुतार हिची डाटा ॲनालिस्ट म्हणून निवड
रत्नागिरी : गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या (स्वायत्त) संगणकशास्त्र विभागातील विद्यार्थिनी तन्वी सुतार हिची नामांकित संशोधन संस्था हैदराबाद येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (टीआयएफआर) येथे डाटा ॲनालिस्ट म्हणून नियुक्ती झाली आहे. ही नियुक्ती बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन ग्रँटअंतर्गत करण्यात आली.
तन्वी सुतार हिला टीआयएफआरकडून अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात आले. तिची कामाचे ठिकाण डेरवण येथील बी. के. एल. वालावलकर ग्रामीण वैद्यकीय महाविद्यालय आहे. डाटा विश्लेषण, संगणकशास्त्र आणि संशोधन क्षेत्रातील कौशल्यांना मिळालेली ही महत्त्वपूर्ण संधी विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. देशातील अग्रगण्य संशोधन संस्थेशी संबंधित प्रकल्पात काम करण्याची संधी मिळणे, ही त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक वाटचालीतील उल्लेखनीय कामगिरी मानली जात आहे. प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, प्रशासकीय उपप्राचार्य डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई, शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या डॉ. अपर्णा कुलकर्णी, संगणकशास्त्र व डाटा सायन्स विभागप्रमुख प्रा. अमोल सहस्रबुद्धे, आयटीसीएस समन्वयक प्रा. अनुजा घारपुरे आदींनी तिचे अभिनंदन केले.




