
गुहागर तालुक्यातील कुटगिरीतील लोखंडी साकव कोसळला; एका बैलाचा मृत्यू, सहा जनावरे जखमी
गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाणाजवळील लोखंडी साकव अचानक कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. साकवाखाली अडकलेल्या जनावरांपैकी एका बैलाचा मृत्यू झाला, तर सहा जनावरे जखमी झाली असल्याची माहिती गुहागर आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
घटनेची माहिती मिळताच मंडळ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता आणि पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी रवाना करण्यात आले. स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांच्या मदतीने साकवाखाली अडकलेल्या जनावरांची सुटका करण्यात आली.
या दुर्घटनेत एका बैलाचा जागीच मृत्यू झाला असून जखमी झालेल्या सहा जनावरांवर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार करण्यात येत आहेत. साकव कोसळण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.




