मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात ट्रेलरचा भीषण अपघात; चालकाची अग्निशमन दलाकडून सुखरूप सुटका


रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अंजणारी घाटात शुक्रवारी चारचाकी ट्रेलरचा भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या ट्रकला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रेलर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ट्रेलर थेट रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन जोरदार आदळला. अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रेलरचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला, तर चालक केबिनमध्ये अडकून पडला.

अपघाताची माहिती मिळताच लांजा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक निळकंठ बगळे, पोलिस उपनिरीक्षक मेदाड, हातखंबा वाहतूक मदत केंद्राचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सत्यजित घुले, एएसआय तळेकर तसेच पोलिस कर्मचारी दोरखंडे आणि खेडेकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी वाहतूक सुरळीत ठेवत बचावकार्य सुरू केले.

चालक केबिनमध्ये अडकल्याने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. एमआयडीसी रत्नागिरी विभागाचे उपअग्निशमन अधिकारी विवेक राणे, चालक हर्षल आखाडे तसेच अग्निशमन विमोचक प्रवीण पवार, प्रमोद राठोड, पृथ्वीराज मोरे आणि देवराज बंडगर यांनी अथक प्रयत्न करून चालकाची सुखरूप सुटका केली.

या अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक पूर्ववत सुरू केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button