
वाकेड घाटात पेट्रोल पंपाच्या कामाच्या ठिकाणी दरड कोसळली; वृद्ध दरडीखाली अडकल्याची भीती, युद्धपातळीवर बचावकार्य
लांजा तालुक्यातील वाकेड बौद्धवाडीजवळ मुंबई-गोवा महामार्गालगत सुरू असलेल्या पेट्रोल पंपाच्या बांधकामस्थळी शनिवारी सायंकाळी सुमारे ८.३० वाजण्याच्या सुमारास दरड कोसळून एक वृद्ध व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. घटनेनंतर प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाकेड घाट परिसरात पेट्रोल पंपाचे काम सुरू असून, त्या ठिकाणी कामगारांसाठी तात्पुरती केबिन उभारण्यात आली होती. मुसळधार पावसामुळे एक वृद्ध व्यक्ती या केबिनजवळ आश्रयासाठी थांबली होती. त्याचवेळी डोंगराचा काही भाग अचानक खचल्याने मोठी दरड कोसळली आणि संबंधित वृद्ध व्यक्ती मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनास्थळी काम करणारे जेद अतिकुल त्यागी (वय १८), सुवेल अयुब त्यागी (वय १९) आणि महंमद समीन साहवेज (वय २२) हे तिन्ही कामगार सुखरूप बचावले असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही.
बचावकार्यासाठी जेसीबी यंत्रणा, लांजा येथील आपत्कालीन व्यवस्थापन पथक तसेच महसूल प्रशासनाला पाचारण करण्यात आले आहे.
तहसीलदार प्रियंका ढोले यांनीही घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला. पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथक दरडीखाली अडकलेल्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करत असून, परिसरात सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी घेण्यात आली आहे.



