
राजापूर रोड रेल्वे स्थानकात प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळले; सुदैवाने जीवितहानी टळली
राजापूर : कोकण रेल्वेवरील राजापूर रोड रेल्वे स्थानकातील प्रवासी प्रतीक्षालयाचे सिलिंग मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने त्यावेळी मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस स्थानकात येणार असल्याने प्रतीक्षालयातील प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेले होते. त्यामुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
सिलिंग कोसळताच स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन कोसळलेल्या भागाखाली कोणी अडकले नसल्याची खातरजमा करण्यात आली. या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसली, तरी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त सिलिंगची दुरुस्ती तातडीने सुरू करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला देण्यात आल्या.
विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारची ही दुसरी घटना आहे. पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च करून स्थानकाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले होते. मात्र काम सुरू असतानाही छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली होती. त्यामुळे त्या कामांच्या गुणवत्तेबाबत त्यावेळीही प्रश्न उपस्थित झाले होते.
आता पुन्हा प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळल्याने विकासकामांच्या दर्जासह देखभाल व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून करण्यात आलेल्या कामांची तांत्रिक गुणवत्ता तपासावी आणि दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी प्रवासी, स्थानिक नागरिक आणि विविध स्तरांतून होत आहे. तसेच स्थानकातील सर्व इमारती व बांधकामांची तातडीने तांत्रिक तपासणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी पुढे येत आहे



