
प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेसाठी आता झाडांऐवजी अल्गी ट्री! पुण्यात अनोख्या पर्यावरणीय तंत्रज्ञानाचा प्रयोग!
पुणे : पुण्यात प्रदूषणमुक्त स्वच्छ हवेसाठी अल्गी ट्री बसविण्याचा अनोखा प्रयोग पुण्यात करण्यात आला आहे. पारंपरिक वृक्षलागवडीसाठी पुरेशी माती आणि जागा आवश्यक असते. त्यामुळे पारंपरिक हरित क्षेत्र विकसित करणे कठीण असलेल्या ठिकाणी पर्यावरणपूरक उपाय उपलब्ध करून देण्यासाठी अल्गी ट्री या उपकरणाची रचना करण्यात आली आहे. यामुळे शहरी भागात रस्त्यांवर हे उपकरण बसवून स्वच्छ हवा मिळविणे शक्य होणार आहे.
अल्गी ट्री हे प्रगत शहरी पर्यावरणीय तंत्रज्ञान असून, सूक्ष्म शैवालांवर आधारित जैविक प्रणाली, यांत्रिक गाळणी, स्वयंचलित यंत्रणा आणि पर्यावरणीय निरीक्षण यांचा एकत्रित वापर करून दाट लोकवस्तीच्या शहरी भागांमध्ये हवा शुद्धीकरण आणि कार्बन शोषणाला मदत करते. या तंत्रज्ञानामध्ये पीएम २.५ आणि पीएम १० या सूक्ष्म कणांचे प्रमाण कमी करण्यास मदत करणाऱ्या गाळणी प्रणालीचाही समावेश आहे. सौरऊर्जेच्या सहाय्याने चालणारी ही प्रणाली बाह्य ऊर्जास्रोतांवरील अवलंबित्व कमी करण्यास मदत करते. तसेच, तिची कॉम्पॅक्ट रचना निवासी टाउनशिप, कॉर्पोरेट कॅम्पस, व्यावसायिक संकुले, सार्वजनिक ठिकाणे आणि स्मार्ट सिटी पायाभूत सुविधांसाठी उपयुक्त ठरते.
पुण्यातील हडपसर येथील अमनोरा टाउनशिपमध्ये चार अल्गी ट्री उपकरणे बसविण्यात आली आहेत. अमनोरा टाउनशिपचे विकासक असलेल्या सिटी कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अनिरुद्ध देशपांडे यांच्या उपस्थितीत नंदकुमार घुले यांच्या हस्ते या अल्गी ट्री उपकरणांचे उद्घाटन करण्यात आले. अमनोरा टाउनशिपमध्ये सुमार १२ हजार मोठे वृक्ष व ४० हजार छोटी झाडे झुडुपे लावण्यात आली आहेत. या झाडांच्या लागवडीत घुले यांचा मोठा वाटा आहे. अमनोरा टाउनशिप स्वच्छ हवा निर्मितीला झाडांसोबातच एक नवीन पूरक तंत्रज्ञान स्वीकारणारे महाराष्ट्रातील पहिले टाउनशिप ठरले आहे.
प्रणाली कार्य कसे करते?
ही प्रणाली भोवतालची हवा आत शोषून घेते आणि त्यातील सूक्ष्मकण गाळून कार्बन डायऑक्साइडयुक्त हवा सूक्ष्म शैवाल असलेल्या संवर्धन कक्षात पाठवते. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेद्वारे सूक्ष्म शैवाल कार्बन डायऑक्साइड शोषून ऑक्सिजन सोडतात. सेन्सर्स आणि स्मार्ट तंत्रज्ञानाच्या मदतीने प्रणाली पर्यावरणीय आणि कार्यप्रणालीशी संबंधित विविध घटकांचे सातत्याने निरीक्षण करते. कार्यप्रणालीच्या परिस्थितीनुसार अल्गी ट्री उपकरणामध्ये जमिनीवरील समतुल्य क्षेत्रफळाच्या झाडांच्या तुलनेत लक्षणीयरीत्या अधिक प्रमाणात कार्बन डायऑक्साइड शोषण्याची क्षमता असून, त्याची शोषण क्षमता वर्षाला १.५ टनांपर्यंत आहे. दोन वर्षांहून अधिक काळाच्या संशोधन, अभियांत्रिकी आणि प्रयोगांनंतर विकसित करण्यात आलेले अल्गी ट्री तंत्रज्ञान जैवतंत्रज्ञानाची स्वयंचलित प्रणाली आणि पर्यावरणीय निरीक्षणाशी सांगड घालते. या तंत्रज्ञानाचे इंदूर येथील स्कूल ऑफ एनर्जी अँड एन्व्हायर्नमेंटल स्टडीज या संस्थेने प्रमाणीकरण केले असून इकेआय एनर्जी सर्व्हिसेस या संस्थेने या तंत्रज्ञानाची पुनर्तपासणी केली आहे.




