१० किलो अंबरग्रीस जप्त; खेडजवळ कस्टम्सची धडक कारवाई, दोघे ताब्यात


मुंबई-गोवा महामार्गावरील खेड रेल्वे स्थानक परिसरात दापोली कस्टम्स विभागाने मोठी कारवाई करत सुमारे १० किलोहून अधिक वजनाचे अंबरग्रीस (व्हेल माशाची उलटी) जप्त केले. या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांना न्यायालयाने ३० जून २०२६ पर्यंत न्यायिक कोठडी सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबरग्रीसची बेकायदेशीर वाहतूक व विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती दापोली कस्टम्स विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा रचून खेड रेल्वे स्थानकाजवळ एका रेनॉल्ट क्विड कारची तपासणी केली. झडतीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात अंबरग्रीस आढळून आले.

अंबरग्रीस हा अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान पदार्थ मानला जातो. मात्र, तो वन्यजीव (संरक्षण) कायदा १९७२ अंतर्गत संरक्षित श्रेणीत येत असल्याने त्याची बेकायदेशीर साठवणूक, वाहतूक किंवा विक्री हा गंभीर गुन्हा मानला जातो. त्यामुळे संबंधित साठा जप्त करण्यात आला.

ताब्यात घेतलेल्या दोघांना खेड येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत न्यायिक कोठडी सुनावत जप्त मुद्देमाल वन विभागाच्या अधिकृत ताब्यात देण्याचे निर्देश दिले.

या कारवाईमुळे अंबरग्रीसच्या अवैध व्यापारात गुंतलेल्या रॅकेटविरोधात मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे. पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button