
नाणार-इंगळवाडी,नाटे दुर्घटनेतील बेपत्ता मुलीचा शोध सुरू; पोलीस अधीक्षक श्री. नितीन बगाटे यांच्याकडून बोटीतून शोधमोहीम.

दिनांक 11/10/2026 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील नाटे पोलीस ठाणे हद्दी मधील नाणार-इंगळवाडी येथिल खाडीपात्रात कालवे काढण्यासाठी गेलेल्या एका कुटुंबातील तीन अल्पवयीन मुलांचा खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.
या गंभीर दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांनी तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी यांनी तात्काळ नाटे येथील घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली तसेच संबंधित कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर दिला आहे.

या दुर्घटनेत तीन अल्पवयीन मुलांचे मृतदेह मिळून आलेले आहेत व याच कुटुंबातील अन्य एक अल्पवयीन मुलगी अद्याप बेपत्ता असून, तिचा शोध घेण्यासाठी खाडीपत्रात व परिसरात मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) हे स्वतः तसेच मा. अपर पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. बी.बी. महामुनी व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बोटीतून शोध मोहीम राबवली तसेच दुर्घटना घडल्या पासून मा. पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाणे येथील पोलीस अधिकारी अंमलदार तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने अनेक लहानमोठ्या बोटीतून घटनास्थळाच्या परिसरात शोधमोहीम दिवस-रात्र राबविण्यात येत आहे.
या पार्श्वभूमीवर मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी श्री. नितीन दत्तात्रय बगाटे (भा.पो.से.) यांनी स्थानिक नागरिकांशी संवाद साधून समुद्रकिनारे, खाडीपात्रे, नद्या व अन्य जलक्षेत्रांमध्ये वावरताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले तसेच पाण्याची खोली, पाण्याचा प्रवाह तसेच भरती-ओहोटीचा अंदाज न आल्याने अशा ठिकाणी दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी विशेषतः लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे लक्ष देण्या बाबत आणि धोकादायक जलक्षेत्रांमध्ये आपल्या लहान मुलांना एकटे सोडण्यात येऊ नये, पाठविण्यात येऊ नये अथवा जाण्यास मज्जाव करण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे.




