सिंधुदुर्गात उभारणार भव्य ‘मालवणी भाषा भवन ;मंत्री उदय सामंत



मुंबई :- कोकणची अस्मिता आणि समृद्ध संस्कृतीचे प्रतीक असलेल्या मालवणी भाषेला हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भव्य मालवणी भाषा भवन उभारण्याची मोठी घोषणा मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांनी विधानसभेत केली आहे. या निर्णयामुळे मालवणी बोलीभाषेच्या जपणुकीसह तिचा जागतिक प्रसार होण्यास मोठी मदत होणार आहे.

विधानसभेत झालेल्या अर्धा तास चर्चेला उत्तर देताना मंत्री सामंत यांनी मराठी भाषेच्या व्यापक प्रसारासाठी राज्य शासनाचा महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला.
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्यातील आठ प्रमुख शहरांमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज अशी मराठी भाषा विकास केंद्रे उभारली जाणार आहेत.यात पुणे,नाशिक,रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर,अमरावती, नागपूर,चंद्रपूर आणि कोल्हापूर या शहरांचा समावेश आहे.

मराठी भाषेचा डंका जागतिक पातळीवर वाजवण्यासाठी शासनाने कंबर कसली असून, मंत्री सामंत यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत.लंडनमधील ‘महाराष्ट्र मंडळा’च्या इमारतीची मालकी आता महाराष्ट्र शासनाने घेतली असून, तिथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने मराठी भाषा वैश्विक केंद्र सुरू केले जाणार आहे.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कवी कुसुमाग्रजांच्या नावाने मराठी अध्यासन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘गनिमी काव्या’वर आधारित विशेष अभ्यासक्रम शिकवला जाईल.तसेच तिथे महाराजांचा भव्य अश्वारूढ पुतळाही उभारण्यात येणार आहे.

मालवणी भाषा भवनाच्या या घोषणेचे सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्वागत केले असून, कोकणवासीयांच्या वतीने त्यांनी शासनाचे आभार मानले आहेत. या निर्णयामुळे प्रादेशिक बोलीभाषा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाला नवी दिशा मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button