विहिरीत पडलेल्या भेकराला वन विभागाचे जीवदान; उपचारासाठी पुण्याला हलवले


दापोली तालुक्यातील खेर्डी-माळवाडी येथे शेतातील विहिरीत पडलेल्या भेकराची वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने ग्रामस्थांच्या मदतीने यशस्वी सुटका केली. या बचाव मोहिमेमुळे जखमी भेकराला वेळेत उपचार मिळू शकले.

खेर्डी-माळवाडी येथील ग्रामस्थ पांडुरंग केळकर यांनी त्यांच्या शेतातील विहिरीत भेकर पडल्याचे निदर्शनास येताच तातडीने दापोली वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे रेस्क्यू पथक घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने अत्यंत सावधगिरीने भेकराला विहिरीतून सुरक्षित बाहेर काढण्यात आले.

मात्र, पडल्यामुळे भेकराच्या पुढील उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. प्राथमिक तपासणीनंतर त्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील वन्यजीव रेस्क्यू सेंटरमध्ये हलविण्यात आले असून, त्याच्यावर तज्ज्ञांकडून उपचार सुरू आहेत.

वन विभागाने या बचाव मोहिमेत सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचे आभार मानले असून, वन्यप्राणी आढळल्यास किंवा अडचणीत असल्याचे दिसून आल्यास त्यांना स्वतःहून हाताळण्याचा प्रयत्न न करता तातडीने वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button