विधान परिषदेसाठी भाजपची ११ उमेदवारांची यादी जाहीर


विधान परिषदेच्या १६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने आपल्या ११ उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीत नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारी देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.तसेच माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांनाही पक्षाने पुन्हा एकदा संधी दिली आहे.

भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत सोलापूरमधून राजेंद्र राऊत, अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना मतदारसंघातून सुहास शिरसाट, नांदेडमधून अमर राजूरकर, तर धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातून बसवराज पाटील यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय भंडारा-गोंदिया मतदारसंघातून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.विदर्भातील अमरावती मतदारसंघातून माजी मंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्यावर पुन्हा विश्वास दाखवण्यात आला आहे. तसेच सांगली-सातारा मतदारसंघातून धैर्यशील कदम, जळगावमधून नंदकिशोर महाजन, नागपूरमधून डॉ. राजीव पोतदार आणि वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली मतदारसंघातून अरुण लखानी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, उमेदवारांची अंतिम यादी निश्चित करण्यासाठी भाजपमध्ये अनेक स्तरांवर चर्चा आणि बैठका पार पडल्या. राज्यातील बैठकीत सुरुवातीला सुमारे ४८ इच्छुकांची नावे विचाराधीन होती. त्यानंतर ही यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात आली. दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीत अंतिम चर्चा झाल्यानंतर उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

भाजपच्या या उमेदवार यादीत नव्या चेहऱ्यांना संधी देतानाच अनुभवी नेत्यांनाही स्थान देण्यात आल्याने आगामी विधान परिषद निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button