भोस्ते घाटात कंटेनरचा अपघात; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ८ तास विस्कळीत


मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील भोस्ते घाटात बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास कंटेनरचा अपघात होऊन चालक जखमी झाला. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक तब्बल आठ तासांहून अधिक काळ विस्कळीत झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, डीडी-०३ आर-९९७३ क्रमांकाचा कंटेनर भोस्ते घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेत विकास सिंह (चालक) जखमी झाला. घटनेची माहिती मिळताच खेड मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रसाद गांधी आणि अभिषेक डेरवणकर यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला प्राथमिक उपचार उपलब्ध करून दिले. त्यानंतर त्याला पुढील उपचारांसाठी भरणे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातानंतर कंटेनर रस्त्यात अडकल्याने महामार्गावरील वाहतुकीचा मोठा खोळंबा झाला. दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दुपारी २ वाजल्यानंतर अपघातग्रस्त कंटेनर हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. या काळात वाहतूक भोस्ते घाटातील एका मार्गिकेतून पर्यायी पद्धतीने सुरू ठेवण्यात आली.

कंटेनर हटविण्याच्या कामामुळे वाहतुकीचा वेग मंदावला होता. त्यामुळे प्रवाशांना अनेक तास प्रतीक्षा करावी लागली. सायंकाळी उशिरा कंटेनर बाजूला करण्यात आल्यानंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. या घटनेमुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण झाला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button