
नवीन सोनवी पुलावर पहिलाच अपघात; दोन अवजड वाहनांची समोरासमोर धडक, तिघे किरकोळ जखमी
नुकताच वाहतुकीसाठी एका बाजूने खुला करण्यात आलेल्या सोनवी पुलावर मंगळवारी सकाळी पहिलाच अपघात घडला. मुंबई-गोवा महामार्गावरील या पुलावर आयशर ट्रक आणि कंटेनर यांची समोरासमोर धडक झाल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली. या अपघातात तिघेजण किरकोळ जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई आणि गोवा या दोन्ही दिशांनी येणारी अवजड वाहने सोनवी पुलावरून जात असताना समोरासमोर आली आणि त्यांची जोरदार धडक झाली. अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. धडकेमुळे दोन्ही वाहनांचे नुकसान झाले असून पुलावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प झाली होती.
सध्या पुलाच्या एका मार्गिकेवरून दोन्ही बाजूंची वाहतूक सुरू आहे. मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेचे काम अद्याप सुरू असल्याने वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र पुलावरील तीव्र वळण, अवजड वाहनांची वर्दळ आणि मर्यादित जागा यामुळे चालकांना अतिरिक्त सतर्कता बाळगावी लागत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
घटनेची माहिती मिळताच संगमेश्वर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघातग्रस्त वाहने बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. जखमी झालेल्या तिघांवर स्थानिक ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, वाढत्या वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर पुल परिसरात आवश्यक सुरक्षा उपाययोजना, स्पष्ट दिशादर्शक फलक आणि वाहतूक नियंत्रणाची व्यवस्था अधिक प्रभावी करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.




