कोकणात ‘जबाबदार पर्यटन’ संकल्पना रुजवण्याची आवश्यकता-धीरज वाटेकर


चिपळूण :: सध्याच्या परिस्थितीमध्ये पर्यटनाची व्याख्या बदलली आहे. लोकांना सिमेंटची जंगले आणि कृत्रिम रिसॉर्ट्स नको आहेत. त्यांना हेरीटेजसह शुद्ध हवा, संथ वाहणारी नदी आणि शांत समुद्रकिनारा हवा आहे. कोकणातील आंबा, काजू, कोकम, सुपारीच्या बागा ही पर्यटकांची आकर्षणे आहेत. ‘होमस्टे’मुळे पर्यटकांना खाद्यसंस्कृतीचा आस्वाद घेता येत आहे. त्याचवेळी स्वच्छ आणि सुंदर म्हणून ओळख असलेले इथले किनारे आणि गावे कचऱ्याच्या विळख्यात अडकत आहेत. कोकणसाठी ‘पर्यावरणपूरक विकास’ स्वीकारताना ‘जबाबदार पर्यटन’ संकल्पना रुजवण्याची आवश्यकता आहे. निसर्गसंपदा, सुंदर समुद्रकिनारे आणि संवेदनक्षम जैवविविधता टिकवण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे, असे मत ‘जागतिक पर्यटन दिन’ आणि ‘जागतिक नदी दिन’ पूर्वसंध्येला पर्यटन-पर्यावरण अभ्यासक-साहित्यिक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले आहे.

अथांग समुद्रकिनारे, हिरवीगार वनराई, ऐतिहासिक किल्ले, आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा यांमुळे पर्यटकांची पावले कोकणाकडे वळत आहेत. कोकणची स्वतःची एक वेगळी जीवनशैली, दशावतार, जाखडी सारख्या लोककला आणि खाद्यसंस्कृती आहे. कोकणची जैवविविधता संवेदनशील आहे. समुद्रकिनाऱ्यांवर होणारी प्लास्टिकची गर्दी, कांदळवनांचे (मॅन्ग्रोव्हज) नुकसान, वाढते प्रदूषण यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. वाढत्या पर्यटनासोबत कोकणच्या मूळ सौंदर्याला, पर्यावरणाला तडे जाऊ लागलेत. आपण निसर्गाचा अतिवापर केला, तर भविष्यातील पिढ्यांसाठी काहीच उरणार नाही. त्यामुळे आपल्याला निसर्गपूरक पर्यटनाची प्रारूपे विकसित करावी लागणार आहेत. यासाठी कायद्यांच्या कठोर अंमलबजावणीसह हॉटेल व्यावसायिक, पर्यटक आणि स्थानिक प्रशासन यांच्यात समन्वय निर्माण होण्याची आवश्यकता आहे. येणाऱ्या पर्यटकांना ‘अतिथी देवो भव’ म्हणताना कोकणच्या भूमीलाही ‘पवित्र’ मानून तसेच वावरण्याची जाणीव करून द्यावी लागणार आहे. कोकणात, पर्यटक आणि पर्यटन व्यावसायिक दोघेही निसर्ग, पर्यावरण आणि स्थानिक संस्कृतीला कोणतीही हानी न पोहोचवता पर्यटनाचा आनंद घेतील असे ‘जबाबदार पर्यटन’ रुजविण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. आपल्याला पर्यटकांमध्ये कचरा व्यवस्थापन आणि निसर्गाचा आदर राखण्याची जाणीव निर्माण करावी लागणार आहे. समुद्रकिनाऱ्यावर कुठेही कचरा टाकणाऱ्यांवर मोठा आर्थिक दंड आकारण्याची आवश्यकता आहे. यासाठी समुद्रकिनाऱ्यांवर ‘स्वच्छता व सुरक्षा रक्षक’ नेमावे लागतील. कचऱ्याच्या उगमस्थानी असलेल्या हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि होमस्टे धारकांना ओला आणि सुका कचरा वेगळा करणे बंधनकारक करावे लागेल. ओल्या कचऱ्यापासून खत निर्मितीचे प्रकल्प राबवावे लागतील. कोकणात सर्वत्र दर्शनी भागात ‘निसर्गाचा आदर करा’, ‘कचरा कुंडीचा वापर करा’ अशा स्वरूपाचे फलक मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत लावण्याची गरज आहे. कोणत्याही पर्यटनस्थळाची कचरा पेलण्याची स्वतःची एक क्षमता असते. पर्यटनाचा आनंद घेताना निसर्गाची हानी होणार नाही, याची जबाबदारी घेण्याची पर्यटकांनी मानसिकता बनवण्याची आवश्यकता आहे. तशी वातावरण निर्मिती आपल्याला कोकणात करावी लागणार आहे. कोकणात प्रवेश करणाऱ्या प्रमुख घाटांवर किंवा टोल नाक्यांवर पर्यटकांच्या वाहनांची तपासणी करून कचरा योग्य त्या ठिकाणी संकलित करता येईल. समुद्रकिनाऱ्यावर, ऐतिहासिक किल्ल्यांवर आणि पर्यटन स्थळांवर क्यूआर कोड लावून पर्यटकांना परिसराचे महत्त्व आणि कचरा न करण्याचे आवाहन करणारा दृकश्राव्य संदेश देता येईल.

कोकणात अलिबाग, मुरुड, दिवेआगर, गुहागर, दापोली, गणपतीपुळे, आंबोली, मालवण, तारकर्ली, वेंगुर्ला यांसारख्या समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची वर्षभर गर्दी असते. स्कूबा डायव्हिंग, वॉटर स्पोर्ट्स आदी उपक्रमांमुळे पर्यटनाला व्यावसायिक स्वरूप आले आहे. ‘होमस्टे’च्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे होत असलेले चौपदरीकरण आणि रेल्वे गाड्यांच्या संख्या विस्तारामुळे कोकणात पोहोचणे सोपे झाले आहे. यामुळे पर्यटन वाढण्यासोबत एकेकाळी स्वच्छ आणि सुंदर म्हणून ओळखले जाणारे कोकणातील किनारे आणि गावे हळूहळू कचऱ्याच्या विळख्यात अडकू लागली आहेत. पूर्वी कोकणात येणारा कचरा हा प्रामुख्याने जैविक किंवा विघटनशील स्वरूपाचा असायचा. परंतु, पर्यटनाच्या व्यापारीकरणामुळे कचऱ्याचे स्वरूप गुंतागुंतीचे आणि घातक झाले आहे. सध्या पर्यटनाच्या ठिकाणी सर्वाधिक आढळणारा कचरा म्हणजे प्लास्टिक आहे. पाण्याच्या बाटल्या, शीतपेयांचे कॅन, वेफर्सची पाकिटे, प्लास्टिकचे चमचे आणि पिशव्या कशाही फेकून दिल्या जातात. हे प्लास्टिक समुद्रकिनाऱ्यावर आणि समुद्रात जमा होत आहे. अनेक समुद्रकिनाऱ्यांवर रात्रीच्या वेळी मद्यपान करणाऱ्या पर्यटकांचे प्रमाण वाढले आहे. काचेच्या बाटल्या तिथेच टाकल्या जातात किंवा फोडल्या जातात. इलेक्ट्रॉनिक कचरा, खराब झालेले साहित्य आणि सॅनिटरी वेस्ट यांचे प्रमाणही चिंताजनक रितीने वाढते आहे. याचा कोकणाच्या संवेदनशील परिसंस्थेवर घातक परिणाम होत आहे. खरंतर कोकणातील पर्यटनस्थळांना ‘झिरो वेस्ट’ झोनच्या दिशेने नेण्याची आवश्यकता आहे. पण सध्या प्लॅस्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, पॅकेज्ड फूड यांवर पूर्ण बंदी घातल्यास पर्यटकांची गैरसोय होऊ शकते. त्यासाठी कोकणात प्रथम सक्षम आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध करावे लागतील. कोकणातील पांढरी वाळू आणि स्वच्छ पाण्यासाठी ओळखले जाणारे किनारे भविष्यात कचऱ्याचे आगार वाटण्याची चिन्हे असल्याचा धोका वाटेकर यांनी अधोरेखित केला आहे.

शनिवार-रविवार किंवा सुट्ट्यांच्या काळात कोकणात येणारे पर्यटक मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा किनाऱ्यावर, रस्त्याशेजारी किंवा जंगलात टाकून जातात. पर्यटकांमध्ये शिस्तीचा अभाव ही सर्वात मोठी अडचण आहे. कोकणातील पर्यटनस्थळे दूरस्थ विखुरलेली आहेत. तिथून गोळा केलेला कचरा रिसायकलिंग प्लांटपर्यंत वाहून नेणे डोंगराळ आणि अंतर्गत भागांमुळे खर्चिक व कठीण ठरते आहे. अनेक गावांमध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यांवर कचरा गोळा करणे, त्याचे वर्गीकरण करणे आणि ओल्या कचऱ्यापासून खत बनवण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक प्रकल्प अद्याप उपलब्ध नाहीत. कोकणात अतिवृष्टी होते. मुसळधार पावसामुळे उघड्यावरील कचरा व्यवस्थापन कोलमडते आणि नद्यांमधून वाहून आलेला प्लॅस्टिक कचरा थेट समुद्रात व किनाऱ्यांवर साचतो. कधीकधी महापुराचे कारणही बनतो. कोकणातील ग्रामपंचायतींकडे मर्यादित निधी आणि मनुष्यबळ असते. अचानक वाढणाऱ्या पर्यटकांच्या संख्येनुसार कचऱ्याचे व्यवस्थापन करणे स्थानिक प्रशासनाला जमत नाही हे वास्तव आहे. आजही कोकणातील बहुतांश गावे आणि नगरपालिकांकडे कचरा गोळा करण्यासाठी, त्याचे वर्गीकरण करण्यासाठी आणि वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावण्यासाठी पुरेशी यंत्रणा किंवा डंपिंग ग्राऊंड्स उपलब्ध नाही. अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात, पण तिथली स्वच्छता राखण्याची जबाबदारी विसरतात. ‘आपण पैसे दिले आहेत, तर कचरा कुठेही टाकण्याचा आपल्याला अधिकार आहे’ अशी मानसिकता अनेकदा पाहायला मिळते. यामुळे कोकणात समुद्रकिनाऱ्यासह सर्वत्र कुठेही कचरा टाकणाऱ्यांवर मोठा आर्थिक दंड आकारताना ‘जबाबदार पर्यटन’ संकल्पना रुजवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे वाटेकर यांनी म्हटले आहे.

कोकणातील वाढते पर्यटन हे निसर्गाचा शाप नसून आर्थिक प्रगतीचे एक मोठे वरदान आहे. कचऱ्याची समस्या ही कायमस्वरूपी नसून ती अयोग्य व्यवस्थापनाचा परिणाम आहे. त्यामुळे प्रशासन, स्थानिक नागरिक आणि पर्यटक यांनी एकत्र येऊन ‘शाश्वत पर्यटनाचा’ मार्ग स्वीकारला तर कोकणचे सौंदर्य अधिक खुलेल. कोकण पर्यटनाचे भविष्य हे ‘लोकसहभाग’ आणि ‘शाश्वत दृष्टी’ यावर अवलंबून आहे. कोकणची जनता जागृत होते आहे. रासायनिक प्रदूषणापेक्षा पर्यटनातून मिळणारा रोजगार अधिक शाश्वत, पिढ्यानपिढ्या टिकणारा आणि सन्मानाचा आहे, हे स्थानिकांना पटू लागले आहे. कोकण ही विकण्याची जमीन नसून जपण्याची संस्कृती आहे, हे लक्षात येत असल्याचे निरीक्षण वाटेकर यांनी नोंदवले आहे.

धीरज वाटेकर
dheerajwatekar@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button