
राजापुरात विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू
शेतात गुरे चारायला गेलेल्या एका शेतकऱ्याचा महावितरणच्या जमिनीवर लोंबकळणाऱ्या विजेच्या तारेला स्पर्श झाल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना राजापूर तालुक्यातील अजिवली येथे शनिवारी सायंकाळी घडली.जयवंत राणे (वय ४९, रा. अजिवली) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेनंतर ग्रामस्थ महावितरण विरोधात संतप्त झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, जयवंत राणे हे सायंकाळच्या सुमारास गावातील शिवारात गुरे चारण्यासाठी गेले होते. सायंकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास गवतात पडलेल्या महावितरणच्या विद्युत तारेचा त्यांना जोरदार धक्का बसला. या घटनेची माहिती मिळताच अजिवली गावचे सरपंच संजय राणे यांच्यासह ग्रामस्थांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी जयवंत यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकारी डॉ. तांदळे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.




