
ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे निधन
रत्नागिरी – शिरगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच फरीदा काझी आणि कोकण बँकेचे संचालक दिलीप मुजावर यांचे बंधू, ज्येष्ठ पत्रकार जावेद मुजावर यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनाने पत्रकारिता क्षेत्रासह सामाजिक व सहकार क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.
जावेद मुजावर हे मनमिळाऊ, दिलदार आणि प्रेमळ व्यक्तिमत्त्व म्हणून परिचित होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते कोकण बँकेचे संचालक होते. तसेच एस.टी. महामंडळाच्या सेवेतून ते निवृत्त झाले होते.
पत्रकारितेचीही त्यांना विशेष आवड होती. रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध केटीव्ही न्यूज या वृत्तवाहिनीसाठी त्यांनी काही वर्षे पत्रकार म्हणून काम केले. आपल्या शांत आणि मनमिळाऊ स्वभावामुळे त्यांनी पत्रकारिता क्षेत्रासह विविध क्षेत्रातील व्यक्तींशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण केले होते.
जावेद मुजावर यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, भाऊ, बहिणी असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने मुजावर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्रपरिवार, पत्रकारिता क्षेत्रातील सहकारी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
जावेद मुजावर यांचा अंत्यविधी लांजा येथील त्यांच्या मूळ निवासस्थानी होणार आहे.




