राज्यातील शेतकऱ्यांसाठी मदतीचा हात! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवसेना शेतकरी मदत केंद्र’ सुरू


राज्यातील अनेक भागांत अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः मराठवाड्यात पावसाअभावी परिस्थिती गंभीर बनली असून, कापूस आणि सोयाबीनसह विविध पिकांना मोठा फटका बसला आहे.या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय घेतला असून, त्याबाबतची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी कशी होते, यावर विरोधकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

दरम्यान, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना आणि मदतीचा लाभ मिळवून देण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने पुढाकार घेतला आहे. पक्षाच्या वतीने राज्यातील प्रत्येक तालुका स्तरावर ‘शिवसेना शेतकरी मदत केंद्र’ सुरू करण्यात येणार आहे.या उपक्रमाची सुरुवात २८ सप्टेंबर रोजी खासदार अरविंद सावंत यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले आहे. या मदत केंद्रांमार्फत शेतकऱ्यांना पीक विमा, विमा नुकसानभरपाई, कर्जमाफी, दुष्काळी उपाययोजना तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ घेताना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.

याशिवाय पीक विम्याचे दावे दाखल करणे, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, अर्ज प्रक्रिया तसेच संबंधित शासकीय विभागांकडे पाठपुरावा करण्यासाठीही शेतकऱ्यांना मदत केली जाणार असल्याचे ठाकरेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button