
जाकिमिर्या, काळबादेवी येथे ’पाईल जेटी’
रत्नागिरी जिल्हयातील सागरी दळणवळण आणि पर्यटनाला मोठी गती देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रत्नागिरी तालुक्यातील जाकिमिर्या आणि काळबादेवी या दोन प्रमुख किनारी गावांमध्ये अत्याधुनिक ’पाईल जेटी’ उभारण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने या दोन्ही कामांच्या अंदाजपत्रकाला अधिकृतपणे प्रशासकीय मान्यता दिली आहे. यासाठी एकूण २९ कोटी ८४ लाख रुपयांपेक्षा जास्त निधी मंजूर केला आहे.
सागरी मंडळाच्या प्रस्तावानुसार, तालुक्यातील जाकिमिर्या येथे पाईल जेट्टीच्या बांधकामासाठी १४ कोटी ८६ लाख ४७ हजार २५२ रुपयांच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे, काळबादेवी येथील पाईल जेटीच्या उभारणीसाठी १४ कोटी ९८ लाख ३२ हजार ६७ रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या दोन्ही
प्रकल्पांमुळे रत्नागिरी जिल्हयाच्या किनारपट्टीवरील पायाभूत सुविधांचा चेहरामोहरा बदलणार आहे. या नवीन जेटींमुळे स्थानिक मच्छीमारांना आपल्या नौका सुरक्षितपणे किनार्याला लावण्यासाठी हक्काची आणि आधुनिक जागा उपलब्ध होणार आहे.
त्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक सुकर आणि सुरक्षित होण्यास मदत मिळणार आहे. राज्य शासनाने सन २०२६-२७ या चालू आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पातून ’महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डा’च्या सहाय्यक अनुदानातून या कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. गृह विभागाच्या उप सचिव शुभांगी पोटे यांच्या स्वाक्षरीने हे दोन्ही स्वतंत्र शासन निर्णय जारी करण्यात आले आहेत.www.konkantoday.com




