
हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीतील अभिनेते प्रदीप रावत यांचं निधन
हिंदी, तेलुगू आणि तमिळ चित्रपटसृष्टीत दमदार अभिनयानं स्वतंत्र ओळख निर्माण करणारे अभिनेते प्रदीप रावत यांचं वयाच्या ७४ व्या वर्षी निधन झालं .रक्ताच्या कर्करोगाने ते ग्रस्त होते.त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी कल्याणी रावत आणि मुलगा विक्रमादित्य रावत आहेत.
‘महाभारत’मधील अश्वत्थामाच्या भूमिकेद्वारे रावत यांनी ओळख निर्माण केली. लगान चित्रपटातील देवासिंह ही त्यांची भूमिका विशेष गाजली. गजनी या चित्रपटातील खलनायकी भूमिकेनं त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली.प्रदीप रावत यांचा जन्म मध्यप्रदेशातील जबलपूर इथं झालेला. त्यांचं कुटुंब मूळचं अंबाला इथलं होतं. त्यांचे वडील भारतीय सैन्यात कार्यरत होते आणि प्रदीप यांनाही आधी सैन्यात भरती व्हायचं होतं, पण नशिबानं त्यांना अभिनय क्षेत्राकडं आणलं.
वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले
प्रदीप रावत यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिले. त्यांनी दोन लग्ने केली. पहिल्या पत्नीसोबतचं लग्न अवघ्या साडेपाच महिन्यांत मोडलं होतं. घटस्फोटादरम्यान पहिल्या पत्नीने त्यांच्यावर आणि त्यांच्या कुटुंबावर कौटुंबिक हिंसाचार तसंच हुंडाबळीविरोधी कायद्यान्वये गंभीर आरोप केले होते. एका मुलाखतीत प्रदीप रावत यांनी उघड केलं होतं की, ते आरोप पूर्णपणे खोटे होते. नंतरच्या काळात पहिल्या पत्नीनं कोर्टात स्वतःहून कबुली दिली आणि सर्व खोटे आरोप मागे घेतले, ज्यानंतर हा खटला बंद झाला व दोघांचा घटस्फोट झाला.
आयुष्यात कल्याणी रावत आल्या
पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर त्यांच्या आयुष्यात कल्याणी रावत आल्या. ‘स्टालिन’ या तेलुगू चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांची भेट झाली होती. सुरुवातीला कल्याणी शिस्तप्रिय आणि कडक स्वभावाच्या वाटल्या असल्या तरी एका गाडीच्या बिघाडामुळं झालेल्या प्रवासादरम्यान दोघांमध्ये संवाद वाढला. काही महिने डेट केल्यानंतर २००६ मध्ये दोघांनी लग्न केलं. कल्याणी दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीशी जोडलेल्या असल्या तरी त्या प्रसिद्धीपासून दूर राहणे पसंत करतात.
प्रदीप रावत यांनी ४ दशकांपासून अधिक काळ चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं. १९८८ मध्ये बी. आर. चोप्रा यांच्या ऐतिहासिक ‘महाभारत’ मालिकेत अश्वत्थामाची भूमिका साकारून त्यांना मोठी लोकप्रियता मिळाली. त्यानंतर ‘लगान’ मधील देवा या शूर सैनिकाची भूमिका असो वा आमिर खानच्या ‘गजनी’ (तमिल व हिंदी) चित्रपटातील मुख्य खलनायकाची (गजनी धर्मात्मा) दहशत निर्माण करणारी भूमिका, प्रदीप रावत यांनी प्रत्येक पात्र जिवंत केलं.




