
इंधन संकटात सरकारचा मोठा निर्णय! आता पेट्रोलमध्ये 30% इथेनॉल मिसळण्याची तयारी; E20 नंतर भारताची नवीन भरारी
Ethanol-Blended Petrol Variants : जागतिक इंधन संकट आणि भारतात पेट्रोल-डिझेल दरवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. भारत आता E20 नंतर इथेनॉल मिश्रणाच्या पुढील टप्प्याकडे वेगाने वाटचाल करत आहे. भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS ने देशातील पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणासाठी E22, E25, E27 आणि E30 सारख्या नवीन इथेनॉल-मिश्रित पेट्रोलसाठी अधिकृतपणे मानके जारी केली आहेत.
नवीन मानके 22 ते 30% इथेनॉल वापरून बनवलेले इंधन पेट्रोलमध्ये मिसळण्यास परवानगी देते. तसेच हे इंधन विशेषतः पेट्रोल इंजिन असलेल्या वाहनांमध्ये वापरण्यासाठी तयार केले जाईल.
इथनॉल-मिश्रित पेट्रोलच्या दिशेने भारताची कूच
यावरून सरकार येत्या काही वर्षांत पेट्रोलमधील इथेनॉलचे प्रमाण आणखी वाढवण्याची तयारी करत असल्याचे स्पष्ट दिसून येते. कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे, शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणे आणि प्रदूषण कमी करण्याचा सरकारच्या या नवीन उपक्रमामागचा मुख्य हेतू आहे. भारताने आधीच राष्ट्रीय स्तरावर 18% हून अधिक इथेनॉल मिश्रण साध्य केले असून आता E30 पर्यंतच्या इंधनांसाठी नियामक चौकट तयार करणे ऊर्जा क्षेत्रातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.
US-Iran संघर्षामुळे तेलाच्या पुरवठ्यातील व्यत्ययाच्या पार्श्वभूमीवर भारत क्रूडच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर आणि पर्यायी इंधन स्रोतांचा शोध घेण्यावर लक्ष केंद्रित करत असून याच दिशेने भारताने E22, E25, E27 आणि E30 सारख्या उच्च-इथेनॉल मिश्रित गॅसोलीनसाठी इंधन मानक मार्गदर्शक तत्त्वे औपचारिकपणे स्थापित केली आहेत. याला देशाच्या इथेनॉल मिश्रण कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यासाठी एक नियामक चौकट म्हणून पाहिले जात आहे.
जनतेवर या निर्णयाचा काय होणार परिणाम
लक्षात घ्या की सर्वसामान्य लोकांना लगेचच E22, E25 किंवा E30 पेट्रोल प्रत्येक पेट्रोल पंपावर उपलब्ध होणार नाही तर, जेव्हा सरकार आणि तेल कंपन्या व्यावसायिक वापरासाठी इंधन उपलब्ध करण्याचा निर्णय घेतील, तेव्हा पूर्वी E20 इंधन आणल्याप्रमाणेच निवडक शहरे आणि पंपांवर टप्प्याटप्प्याने उपलब्ध केले जाईल.
भविष्यात यामुळे वाहन आणि इंधनाच्या किमतींवर थेट परिणाम होऊ शकतो. कंपन्या आधीच नवीन E20 आणि उच्च मिश्रित इंधनांशी सुसंगत इंजिनची वाहने लाँच करत असून जुन्या वाहनांच्या मालकांना भविष्यात कार किंवा बाईक उच्च-इथेनॉल मिश्रित इंधनासाठी योग्य आहे की नाही याची खात्री करावी लागेल. इथेनॉलच्या वाढलेल्या वापरामुळे पेट्रोल आयातीचा खर्च कमी होईल, ज्यामुळे दीर्घकाळात इंधनाच्या किमतींवरील दबाव नियंत्रित करण्यास मदत होईल, असे सरकारचे मत आहे. शेतकऱ्यांसाठी, विशेषतः ऊस उत्पादकांसाठी, हा एक मोठा आधार बनू शकतो.




