विविधतेतील एकता हा भारत आणि अमेरिकेचा डीएनए’, न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचे प्रतिपादन!

AHEAD : ‘विविधता आणि एकता हे भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांच्या ‘डीएनए’मध्ये आहे,’ असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथे आयोजित ‘युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन’ (सार्वभौम एकात्मता उत्सव) या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.

‘अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग’ (AHEAD) या संस्थेने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या कार्यक्रमाला विविध धर्मांचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी उपस्थित होते. सरसंघचालकांनी आपल्या भाषणात भारत आणि अमेरिकेतील सांस्कृतिक मूल्यांची तुलना करत वैश्विक एकात्मतेचा संदेश दिला.

विविधता साजरी झाली पाहिजे

आपल्या भाषणात सरसंघचालक म्हणाले, ‘राष्ट्र ही केवळ भौगोलिक रचना नसते. या विश्वाच्या निर्मितीत प्रत्येक राष्ट्राला एक विशिष्ट कर्तव्य पार पाडायचे असते. स्वामी विवेकानंदांनी म्हटल्याप्रमाणे, प्रत्येक देशाचे एक ध्येय असते. भारताचे ध्येय जगाला ‘विविधतेतील एकता’ दाखवून देणे हेच आहे. आपण सर्व एक आहोत आणि आपल्यातील ही विविधता आपल्या एकतेला अधिक सुंदर बनवते.’

ते पुढे म्हणाले, ‘आपल्यातील विविधतेचा स्वीकार आणि आदर झालाच पाहिजे, तिचा उत्सव साजरा केला पाहिजे. परंतु हे करत असताना आपल्या मनातील एकात्मतेची भावना कधीही कमी होता कामा नये. भाषा आणि धर्म वेगवेगळे असल्याने आपण वेगळे आहोत असे वाटू शकते. भौतिकदृष्ट्या ते खरे असले, तरी आत्मिक पातळीवर आपण सर्व एक आहोत.’

मानव आणि प्राण्यांमधील फरक

माणूस आणि प्राण्यांमधील विचारसरणीचा फरक स्पष्ट करताना भागवत म्हणाले, ‘प्राण्यांमध्येही एकतेची भावना असते, परंतु ते त्यानुसार कृती करू शकत नाहीत; कारण ते निसर्गाच्या नियमांनी बांधलेले असतात. प्राण्यांना आपण कोण आहोत किंवा का जन्मलो हे ठाऊक नसते. परंतु, माणसाला विचार करण्याची क्षमता मिळाली आहे. माणूस चांगला विचार करतो तेव्हा तो देवाच्या जवळ जातो आणि वाईट विचार करतो तेव्हा तो प्राण्यांच्या पातळीवर जातो.’

‘जो मुस्लिमांचा तिरस्कार करतो, तो हिंदू असूच शकत नाही’

न्यूयॉर्कमधील दुसऱ्या एका कार्यक्रमात सरसंघचालकांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ‘जर कोणत्याही हिंदूला असे वाटत असेल की भारतात मुस्लिमांना स्थान नसावे, तर ती व्यक्ती हिंदू उरतच नाही. स्वतःला हिंदू म्हणवून घ्यायचे असेल, तर सर्व मार्ग एकाच ध्येयाकडे जातात आणि प्रत्येक मानवाला प्रतिष्ठा आहे, यावर विश्वास ठेवावाच लागेल.’

राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘आजचे राजकारण हा स्वार्थाचा खेळ बनला आहे. संघात आम्ही फक्त देण्याचे काम करतो, कोणत्याही अपेक्षेविना. लोकशाहीत लोकमत महत्त्वाचे असते. जर जनमानस तयार असेल तर कोणताही नेता त्याच्याविरोधात जाऊ शकत नाही.’

चरखी दादरी अपघाताची आठवण*

१९९६ मध्ये हरियाणातील चरखी दादरी येथे झालेल्या भीषण विमान अपघाताची आठवण सरसंघचालकांनी करून दिली. ते म्हणाले, ‘त्या अपघातात मृत्युमुखी पडलेले बहुतांश प्रवासी मुस्लिम होते. पण आमचे स्वयंसेवक सर्वात आधी तिथे पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरू केले. मृतदेहांची ओळख पटवणे असो वा अंत्यसंस्कार, आम्ही कधीही ‘हे मुस्लिम आहेत’ असा विचार केला नाही. सेवाभाव हीच आपली संस्कृती आहे.’

अमेरिकन राजकारण्यांकडून टीका

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या या अमेरिका दौऱ्यादरम्यान न्यूयॉर्कचे पहिले भारतीय वंशाचे मुस्लिम महापौर झोहरान ममदानी यांनी संघावर टीका केली. संघ ही एक जातीयवादी संघटना असल्याचे सांगत, ‘भारताची खरी ओळख ही धर्मनिरपेक्षता आणि सर्वसमावेशकता आहे,’ असे ममदानी म्हणाले. तर दुसरीकडे, सरसंघचालकांच्या या दौऱ्याला भारतीय समुदायाकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button