
लांज्यात आंतरशालेय मॅरेथॉनचा उत्साहात शुभारंभ
‘आजचे बालस्पर्धक हेच उद्याचे भविष्य’; पालकमंत्री उदय सामंत यांचे प्रतिपादन
लांजा : शालेय स्तरापासूनच विद्यार्थ्यांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण व्हावे आणि त्यांच्या शारीरिक व मानसिक विकासाला चालना मिळावी, या उद्देशाने श्री साई अनिरुद्ध एज्युकेशन सोसायटी, पाली संचलित डी. जे. सामंत इंग्लिश मीडिया स्कूल, लांजा आणि रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘लांजा तालुका मर्यादित भव्य आंतरशालेय मॅरेथॉन स्पर्धे’चा शुभारंभ उत्साहात करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष रविंद्र तथा अण्णा सामंत यांच्या हस्ते स्पर्धेचा प्रारंभ झाला.
यावेळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थित राहून बालस्पर्धकांचा उत्साह वाढवला. सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक करताना त्यांनी “आज सहभागी झालेले हे छोटे खेळाडूच उद्याचे भविष्य आहेत,” असे सांगितले.
उदय सामंत म्हणाले की, केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे पुरेसे नसून आजच्या पिढीने शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही सक्षम असणे गरजेचे आहे. खेळामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, जिद्द, संघभावना तसेच पराभवाने खचून न जाता पुन्हा उभे राहण्याची मानसिकता निर्माण होते. मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेला प्रत्येक बालस्पर्धक हा विजेताच आहे. कोण प्रथम किंवा द्वितीय आला, यापेक्षा स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होणे हेच त्यांचे मोठे यश असल्याचे त्यांनी नमूद केले.
या क्रीडा सोहळ्यास आमदार किरणजी भैय्या सामंत, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सदस्या अपूर्वा सामंत, लांजा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सावली कुरुप, उपनगराध्यक्ष मिलिंद लांजेकर, गटनेते योगेश कावतकर, पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर, पंचायत समिती सदस्य उमेश पत्की, पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्यासह लांजा तालुक्यातील विविध शाळांचे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि मोठ्या संख्येने क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा संस्कृती रुजविण्यासाठी आयोजित या मॅरेथॉन स्पर्धेला बालस्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते.




