
दिव्यातील कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवरशिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांकडून प्रशासनाला निवेदन; बी.आर. नगरमधील पाणीवाहिनीची क्षमता वाढविण्याचे आश्वासन
खेड : दिवा शहरातील बी.आर. नगर, समाधान नगर आणि संतोष नगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या समस्येची तातडीने दखल घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिवा प्रभाग समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडे निवेदन सादर केले.
दिवा शहरप्रमुख सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि शाखाप्रमुख उमेश भानसे यांच्या पुढाकाराने हे निवेदन दिवा प्रभाग समितीचे उपअभियंता, पाणीपुरवठा विभागाचे सुरेश वाघेरे यांना देण्यात आले.
बी.आर. नगर, समाधान नगर तसेच संतोष नगर परिसरातील नागरिकांना कमी दाबाने पाणी मिळत असल्याने दैनंदिन गरजांसाठी मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे संबंधित भागातील पाणीपुरवठा व्यवस्था तातडीने पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
निवेदन स्वीकारल्यानंतर उपअभियंता सुरेश वाघेरे यांनी संबंधित परिसरातील पाणीपुरवठा आजपासून सुरळीत करण्याचे आश्वासन दिले. तसेच बी.आर. नगर परिसरातील अंतर्गत पाणीपुरवठा वाहिनीची क्षमता वाढविण्यासाठी सध्या असलेल्या दोन इंची लाईनऐवजी चार इंची लाईन टाकण्याचे काम काही दिवसांत करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
या उपाययोजनेमुळे परिसरातील नागरिकांना भविष्यात अधिक चांगल्या दाबाने पाणीपुरवठा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. शाखाप्रमुख अनिल पवार यांनी प्रभाग क्रमांक २८ मधील कमी दाबाच्या पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत स्वतंत्र निवेदन दिले. या परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीप्रश्नावरही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
उपविभागप्रमुख विलास उतेकर यांनी टाटा पॉवर रस्त्याच्या खडीकरणाबाबत बांधकाम विभागाकडे निवेदन सादर केले. रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता संबंधित काम तातडीने करण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
समर्थ नगरमधील गटार सफाईचा प्रश्न
उपविभागप्रमुख शशिकांत कुंभारगण यांनी समर्थ नगर परिसरातील गटार सफाईबाबतही निवेदन दिले. परिसरातील गटारे नियमितपणे स्वच्छ करण्यात यावीत, तसेच पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या निर्माण होऊ नये यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी करण्यात आली.
उमेश भानसे यांच्या मागणीला प्रशासनाचा प्रतिसाद
दिवा शहरातील विविध नागरी प्रश्नांवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी विविध मागण्यांची निवेदने दिली. विशेषतः बी.आर. नगर, समाधान नगर आणि संतोष नगर परिसरातील पाणीप्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी शाखाप्रमुख उमेश भानसे यांनी केली.
दरम्यान, प्रशासनाकडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे तसेच बी.आर. नगरमधील पाणीवाहिनीची क्षमता वाढविण्याचे आश्वासन मिळाल्याने नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. आता संबंधित कामे प्रत्यक्षात किती लवकर पूर्ण होतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
यावेळी उपशाखाप्रमुख राकेश माळी, गटप्रमुख अरुण जैस्वाल, शिवसैनिक मोरे साहेब यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
खेड तालुक्यातील दयाळ गावचे सुपुत्र आणि दिवा येथील शिवसेनेचे शाखाप्रमुख उमेश भानसे यांनी दिव्यातील नागरिकांच्या मूलभूत नागरी प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला असून, पाणीपुरवठा, रस्ते आणि गटार सफाईसारख्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.




