धावत्या कारला अचानक आग; चालकाच्या सतर्कतेमुळे मोठी दुर्घटना टळली


लांजा–देवरुख मार्गावरील तळवडे फाट्यानजीक मंगळवारी रात्री धावत्या टोयोटा कारला अचानक आग लागून वाहन पूर्णपणे जळून खाक झाले. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत वाहनातून बाहेर पडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, देवरुख येथील मार्लेश्वर फाटा परिसरातील धनंजय गोपाळ केतकर (वय ६३) हे त्यांच्या टोयोटा कारमधून लांजाहून देवरुखकडे जात होते. रात्री सुमारे ८.१५ वाजण्याच्या सुमारास तळवडे फाट्यानजीक वाहनातून अचानक मोठा आवाज येऊ लागला आणि धूर निघत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संभाव्य धोका ओळखून त्यांनी तातडीने वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून स्वतःची सुटका केली. काही क्षणांतच कारने पेट घेतला आणि आगीने संपूर्ण वाहनाला वेढा घातला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक निलकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हवालदार उर्मिला शेडे तसेच पोलीस शिपाई स्वप्नील कदम आणि उमाजी बजागे यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांनीही आग विझविण्याचे प्रयत्न केले.

लांजा नगरपंचायतीकडे अग्निशामक वाहन उपलब्ध नसल्यामुळे देवरुख नगरपंचायतीच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने आग नियंत्रणात आणली; मात्र तोपर्यंत कार पूर्णपणे जळून नष्ट झाली होती.

या घटनेनंतर लांजा तालुक्यासाठी स्वतंत्र अग्निशामक वाहनाची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. यापूर्वीही अंजनारी पुलाजवळ ट्रकला आग लागल्याच्या घटनेवेळी देवरुखच्या अग्निशमन दलाची मदत घ्यावी लागली होती. त्यामुळे भविष्यात अशा आपत्कालीन घटनांना तातडीने प्रतिसाद देता यावा, यासाठी लांजा येथे कायमस्वरूपी अग्निशमन यंत्रणा उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान, वाहनाला आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून, लांजा पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button