एसटीतील महिलेच्या २.६२ लाखांच्या दागिन्यांच्या बॅगेचा काही तासांत शोध

टी-शर्टवरील नावावरून पोलिसांनी लावला बॅगेचा ठावठिकाणा; गैरसमजातून दुसरी बॅग घेऊन गेलेल्या प्रवाशाने दागिन्यांसह बॅग केली परत



राजापूर : पुणे ते राजापूर एसटी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेची दागिने व कपडे असलेली बॅग हरवल्याची घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच राजापूर पोलिसांनी या बॅगेचा शोध लावला. विशेष म्हणजे, बसमध्ये राहिलेल्या दुसऱ्या प्रवाशाच्या बॅगेतील टी-शर्टवर असलेल्या नावाच्या आधारे पोलिसांनी संबंधित प्रवाशाचा शोध घेतला. गर्दीच्या गोंधळात त्याने चुकून महिलेची बॅग नेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याने ती बॅग पोलिसांसमोर महिलेच्या ताब्यात दिली. बॅगेतील सर्व दागिने व साहित्य सुरक्षित मिळाल्याने महिलेने संबंधित प्रवाशाविरोधातील तक्रार मागे घेतली.
अनुजा प्रशांत कांबळे (मूळ रा. पासर्डे, कोल्हापूर; सध्या रा. जैतापूर, राजापूर) या २० सप्टेंबर रोजी दुपारी १२.३० ते सायंकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास राजापूर आगाराच्या एमएच-१४ बीटी-२२७२ क्रमांकाच्या पुणे-राजापूर एसटी बसने प्रवास करीत होत्या. बस कोल्हापूर ते राजापूर मार्गावर पाचल येथे आल्यानंतर त्यांनी सीटवर ठेवलेली आपली काळ्या रंगाची ‘व्हेनस’ कंपनीची बॅग गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ पाचल येथे पोलिसांना याबाबत माहिती दिली.
या बॅगेमध्ये २५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र, ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन टॉप्स, ५ ग्रॅम वजनाची सोन्याची चेन आणि २.५ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, असा सुमारे २ लाख ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज होता.
घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलिसांनी तातडीने राजापूर आगारात जाऊन संबंधित एसटी बसची तपासणी केली. सर्व प्रवासी उतरून गेल्यानंतर बसमध्ये एक बॅग आढळून आली. पोलिसांनी ही बॅग उघडून तपासली असता त्यामध्ये कपडे व अन्य साहित्य आढळले. त्यातील एका टी-शर्टवर ‘नाऊळ, देववाडी, तिठवली, वैभववाडी’ असा उल्लेख असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
या माहितीच्या आधारे राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी तातडीने संबंधित गावच्या पोलीस पाटलांशी संपर्क साधला. त्या दिवशी कोल्हापूरहून आपल्या गावात कोणी प्रवास करून आले आहे का, याबाबत चौकशी करण्यास सांगितले. पोलीस पाटलांनी गावात चौकशी केली असता संबंधित व्यक्ती गावात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर राजापूर पोलिसांचे पथक अनुजा कांबळे यांच्यासह नाऊळ, देववाडी, तिठवली, वैभववाडी येथे पोहोचले. चौकशीदरम्यान संबंधित प्रवाशाने गर्दीच्या गोंधळात चुकून आपली बॅग समजून अनुजा कांबळे यांची बॅग बसमधून नेल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, त्याने ती बॅग उघडून पाहिलीही नव्हती. त्याची स्वतःची बॅग बसमध्ये राहिली होती.
यानंतर संबंधित प्रवाशाने पोलिसांसमक्ष ती बॅग जशीच्या तशी अनुजा कांबळे यांच्या ताब्यात दिली. राजापूर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक अमित यादव यांनी बॅगेची तपासणी केली असता त्यामध्ये महिलेचे सर्व कपडे, साहित्य आणि सोन्याचे दागिने सुरक्षित असल्याचे आढळून आले. त्यानंतर संपूर्ण ऐवजासह बॅग महिलेच्या ताब्यात देण्यात आली.
आपली बॅग, सर्व साहित्य आणि सोन्याचे दागिने सुरक्षितपणे परत मिळाल्याने संबंधित प्रवाशाविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे अनुजा कांबळे यांनी पोलिसांना सांगितले. त्यानुसार त्यांनी आपली तक्रार मागे घेतली.
टी-शर्टवरील नावाच्या आधारे पोलिसांनी लावलेला माग
या प्रकरणात बसमध्ये सापडलेल्या बॅगेतील टी-शर्टवर असलेल्या ठिकाणाच्या नावाचा धागा पकडून राजापूर पोलिसांनी काही तासांत संबंधित प्रवाशाचा शोध घेतला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे महिलेचा लाखो रुपयांचा ऐवज सुरक्षितपणे परत मिळाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button