
दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनीत १९ वर्षीय युवकाची आत्महत्या
खेड तालुक्यातील लोटे-परशुराम औद्योगिक वसाहतीतील दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनी परिसरात १९ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नितीनकुमार प्रमोद सिंग (रा. कमोरिया हाथी बाजार, तेदुई, वाराणसी, उत्तर प्रदेश) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना १६ मे रोजी रात्री १० ते १७ मे २०२६ रोजी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घडल्याचे सांगण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, मयत नितीनकुमार प्रमोद सिंग हा काही वेळापासून दिसून येत नसल्याने त्याचा नातेवाईक सुख्खु लालताप्रसाद सिंग यांनी परिसरात शोधाशोध सुरू केली. त्यावेळी परशुराम येथील दुर्गा ऑर्गेनिक्स कंपनीच्या बॉयलर शेडमध्ये छतावरील लोखंडी पाईपाला गमछाच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत नितीनकुमार आढळून आला.
घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पंचासमक्ष मृतदेह खाली उतरवून कळंबणी ग्रामीण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून नितीनकुमार प्रमोद सिंग यास मृत घोषित केले.




