चिपळूणमध्ये मुंबईतील तरुणाचा मृतदेह वाशिष्ठी नदीत आढळला


चिपळूण, दि. २५ : मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका ४० वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी चिपळूण शहरातील वाशिष्ठी नदीत फरशी तिठा पुलाजवळ आढळून आला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चिपळूण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृताचे नाव अमित शहा (वय अंदाजे ४०) असे असून तो मूळचा गुजरातचा रहिवासी होता व मुंबई येथे वास्तव्यास होता. सुमारे बारा वर्षांपूर्वी त्याने चिपळूण तालुक्यातील वैजी येथील युवतीशी प्रेमविवाह केला होता. तो २१ जून रोजी रेल्वेने चिपळूण येथे आला होता.

गुरुवारी सकाळी फरशी तिठा पुलाजवळील वाशिष्ठी नदीत एका व्यक्तीचा मृतदेह तरंगताना आढळल्याची माहिती मिळताच चिपळूण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढून ओळख पटविण्यात आली. त्यानंतर शवविच्छेदनासाठी मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

या प्रकरणातील सर्व बाबींचा तपास चिपळूण पोलीस करत असून, मृत्यूचे नेमके कारण आणि इतर परिस्थितीचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button