
आंबेनळी घाटात अपघातांना आळा घालण्यासाठी आधुनिक सुरक्षा उपाययोजना; अँटी-क्रॅश बॅरिअर्ससह सुरक्षाकामांना वेग
रायगड जिल्ह्यातील पोलादपूर-महाबळेश्वर मार्गावरील आंबेनळी घाटात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी राज्य शासनाने व्यापक सुरक्षा उपाययोजना हाती घेतल्या आहेत. घाटातील धोकादायक ठिकाणी अँटी-क्रॅश बॅरिअर्स, सुरक्षा कठडे, संरक्षक भिंती, रिफ्लेक्टर, कॅट-आयज, परावर्तित दिशादर्शक फलक आणि सूचना फलक बसविण्याचे काम सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत दिली.
आंबेनळी घाटातील वाढत्या अपघात अनेकांचा बळी गेला होता पार्श्वभूमीवर उपस्थित करण्यात आलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मंत्री भोसले म्हणाले की, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पोलादपूर-महाबळेश्वर मार्ग हा पर्यटन आणि दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. वाढत्या वाहतुकीमुळे या मार्गाचे रुंदीकरण आणि सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्यावर शासनाचा भर आहे.
पोलादपूर ते कुंभरोशी या सुमारे २४.२ किलोमीटर मार्गाच्या सुधारणा आणि रुंदीकरणाचे काम महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत (एमएसआयडीसी) हायब्रीड ॲन्युइटी मॉडेल अंतर्गत सुरू आहे. यामध्ये १४ किलोमीटर रस्त्याचे सात मीटरपर्यंत डांबरीकरण करण्यात येत असून उर्वरित १० किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण आणि मजबुतीकरणही केले जात आहे. तसेच कुंभरोशी ते महाबळेश्वर या १६.३० किलोमीटर लांबीच्या मार्गाच्या रुंदीकरणाची कामे लवकरच सुरू होणार आहेत.
तीव्र उतार, अवघड वळणे आणि खोल दऱ्यांमुळे आंबेनळी घाट हा अपघातप्रवण मार्ग मानला जातो. त्यामुळे येथे विशेष सुरक्षायंत्रणा उभारण्यात येत आहे. रात्रीच्या वेळी तसेच धुक्याच्या वातावरणात वाहनचालकांना मार्ग स्पष्ट दिसावा यासाठी आधुनिक परावर्तित चिन्हे आणि मार्गदर्शक व्यवस्था बसविण्यात येत आहे.
राज्यातील इतर अपघातप्रवण घाटरस्त्यांचाही स्वतंत्र आढावा घेण्यात येत असून रस्ते सुरक्षा लेखापरीक्षणावर विशेष भर दिला जात आहे. आवश्यक ठिकाणी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना, खड्डे दुरुस्ती, रस्ता चिन्हांकन, वेगमर्यादा फलक, चेतावणी फलक आणि प्रकाशयोजना यांची कामे प्राधान्याने हाती घेतली जात असल्याचे मंत्री भोसले यांनी स्पष्ट केले.




