
‘एसबीआय योनो’च्या नावाने ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची ५.२६ लाखांची फसवणूक
चिपळूण : ‘एसबीआय योनो’ अॅपच्या नावाखाली फोन करून चिपळूण शहरातील ८६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ५ लाख २६ हजार २७९ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरील माहिती मिळवून त्याचा गैरवापर करत खात्यातून परस्पर ऑनलाइन व्यवहार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
महालक्ष्मी नगर, खेंड-चिपळूण येथील कविश्वर कृष्णाजी बापट (वय ८६) यांनी याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ मधील कलम ३१८(२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमातील कलम ६६(ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ मार्च रोजी सकाळी ११ वाजल्यापासून ८ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत हा प्रकार घडला. बापट हे घरी असताना एका अज्ञात व्यक्तीने त्यांच्या मोबाईलवर फोन केला. आपण ‘एसबीआय योनो’ अॅपच्या कार्यालयातून बोलत असल्याचे सांगत संबंधित व्यक्तीने बापट यांच्याकडून विविध माहिती घेतली.
त्यानंतर त्यांच्या सर्व्हिस अकाउंटशी संबंधित माहिती मिळवून मोबाईल हॅक करण्यात आल्याचा आरोप आहे. या माहितीचा गैरवापर करून अज्ञात व्यक्तीने बापट यांच्या खात्यातून ५ लाख २६ हजार २७९ रुपयांचे ऑनलाइन व्यवहार स्वतःच्या फायद्यासाठी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर बापट यांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. प्रकरणाचा पुढील तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.




