गणेशोत्सवाआधी मुंबई-गोवा महामार्ग सुकर करण्यासाठी सरकारची धावपळ;माणगाव बायपाससाठी २० ऑगस्टला रेल्वेचा मेगाब्लॉक*


मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेली कामे वेगाने पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले आहेत. केवळ कामांचा आढावा न घेता प्रत्यक्ष कामांना गती देऊन ती पूर्ण करण्यावर भर देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.

महामार्गावरील कोलेटी, संगमेश्वर, निवळी आणि लांजा येथील उड्डाणपुलांची कामे ३१ ऑगस्टपूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर माणगाव बाह्यवळण मार्गातील रेल्वे पुलावर गर्डर टाकण्यासाठी २० ऑगस्टपासून कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गाचे काम दीर्घकाळ रखडल्याने कोकणवासीयांमध्ये नाराजी आहे. गणेशोत्सवासाठी काही दिवसच शिल्लक असल्याने महामार्गाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाची धावपळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महामार्गाची पाहणी केली होती.

या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संबंधित विभाग आणि प्राधिकरणांची बैठक घेऊन गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील वाहतूक शक्य तितकी सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या.

माणगाव बायपाससाठी २० ऑगस्टपासून मेगाब्लॉक

माणगाव बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी कामाला वेग देण्यात आला आहे. सुमारे ७.५ किलोमीटर लांबीच्या या मार्गापैकी तब्बल ५.५ किलोमीटर मार्गावर एकमार्गी वाहतूक सुरू करण्याचे नियोजन आहे.

उर्वरित भागातील कामासाठी २० ऑगस्टपासून कोकण रेल्वेवर मेगाब्लॉक घेऊन रेल्वे पुलावर गर्डर बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित सुमारे दोन किलोमीटर मार्गाचे कामही वेगाने पूर्ण करून तो वाहतुकीसाठी खुला करण्याचे नियोजन आहे.

चिपळूणचा मोठा उड्डाणपूलही गणेशोत्सवापूर्वी खुला करण्याचे लक्ष्य

चिपळूण येथील मोठ्या उड्डाणपुलाचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. पुलावर गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले असून प्रांत कार्यालयाजवळील भरावाचे काम वेगाने सुरू आहे.

पावसाने साथ दिल्यास गणेशोत्सवापूर्वी चिपळूणचा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button