डेरवणच्या लाल मातीत रंगणार कबड्डीचा थरार!

ज्ञानदीप महाविद्यालय आयोजित मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचे उत्साहात उद्घाटन; सावंतवाडी ते पालघरमधील २० संघांचा सहभाग

खेड : ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड संचालित ज्ञानदीप महाविद्यालय विज्ञान व वाणिज्य, मोरवंडे-बोरज यांच्या वतीने आयोजित मुंबई विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा डेरवण येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. स्पर्धेमुळे डेरवण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले असून, सावंतवाडी ते पालघरपर्यंतच्या महाविद्यालयांतील खेळाडूंच्या कौशल्याचा थरार पाहायला मिळणार आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यास रत्नागिरी जिल्हा परिषद सदस्या सौ. पूजा निकम प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी सहभागी खेळाडूंशी संवाद साधून त्यांना शुभेच्छा दिल्या. मैदानावर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करताना खेळाडूंनी शिस्त, संयम आणि खिलाडूवृत्ती जोपासावी, असे आवाहन त्यांनी केले.
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत सावंतवाडी ते पालघर या विस्तृत क्षेत्रातील महाविद्यालयां मधून १२ पुरुष व ८ महिला संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. त्यामुळे स्पर्धेत चुरशीच्या लढती पाहायला मिळणार असून, महाविद्यालयीन खेळाडूंच्या क्रीडागुणांना व्यासपीठ मिळाले आहे.
कबड्डी हा ग्रामीण भागाशी आणि लाल मातीशी घट्ट नाते असलेला पारंपरिक खेळ असून, या खेळातून शारीरिक क्षमता, चपळता, संघभावना आणि निर्णयक्षमता विकसित होते. विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्रातही आपली गुणवत्ता सिद्ध करावी, असे मत ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. उमेशकुमार बागल यांनी व्यक्त केले.
उद्घाटनप्रसंगी संस्थेचे सदस्य श्री. भालचंद्र कांबळे, ज्ञानदीप औषधनिर्माण शास्त्र महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन मा. श्री. रुपल पाटणे, ज्ञानदीप इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्राचार्य श्री. भरत मोरे, श्री. सीतारामपंत जामकर, कोकण विभागीय समितीचे सचिव श्री. शशांक हेगशेटी, क्रीडा शिक्षक श्री. मंगेश सकपाळ यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, क्रीडा विभागाचे प्रतिनिधी, विविध महाविद्यालयांचे प्रशिक्षक, पंच आणि सहभागी खेळाडू उपस्थित होते.
या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, संस्थेचे सरचिटणीस श्री. माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस श्री. प्रकाश गुजराथी, महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन श्री. दीपक लढ्ढा तसेच संस्थेच्या सर्व सभासदांनी आयोजकांचे विशेष कौतुक केले.
ज्ञानदीप महाविद्यालयाच्या पुढाकाराने आयोजित या स्पर्धेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विद्यापीठस्तरीय क्रीडा व्यासपीठ उपलब्ध झाले असून, डेरवण येथे कबड्डीच्या सामन्यांचा उत्साह अनुभवायला मिळणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button