तंत्रज्ञानात रत्नागिरी पोलिस राज्यात अग्रेसर

  • ‘अधिनिर्णय’ अन् ‘मिशन रॅपिड’ या दोन नव्या उपक्रमांचा प्रारंभ*

रत्नागिरी (प्रतिनिधी):
सामाजिक भान राखण्यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रभावी वापर करण्यात रत्नागिरी जिल्हा पोलिस दल संपूर्ण राज्यात अग्रेसर ठरले आहे. पोलिस दलाच्या माध्यमातून जिल्ह्यात सध्या एकूण २९ विविध सामाजिक उपक्रम राबवले जात असून, आता त्यात ‘अधिनिर्णय’ आणि ‘मिशन रॅपिड’ या दोन नवीन महत्त्वाकांक्षी उपक्रमांची भर पडली आहे. रत्नागिरी पोलिस दलाने राबवलेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेऊन त्यांना ई-गव्हर्नन्सचा प्रतिष्ठेचा पुरस्कारही मिळाला असल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक नितीन बगाटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेत माहिती देताना पोलिस अधीक्षक बगाटे म्हणाले की, रत्नागिरी पोलिसांचे काही उपक्रम हे राष्ट्रीय पातळीवरही कौतुकास्पद ठरत आहेत. ‘मिशन रायझिंग फ्लॉवर’ या उपक्रमाच्या माध्यमातून तब्बल २ लाख विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यात पोलिस दलाला यश आले आहे. तर दुसरीकडे ‘मिशन जीवन’ या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांचा मोठा डेटाबेस तयार करण्यात आला असून त्यांच्या प्रत्येक अडचणी व प्रश्न प्राधान्याने सोडवण्यात आले आहेत.
गुन्ह्यांची उकल करण्यासाठी आणि तपासाला गती देण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करताना ‘रेड्स’ ॲपने पोलिस दलात एक प्रकारची क्रांती घडवून आणली आहे. या ॲपच्या प्रभावी वापरामुळे बाहेरच्या जिल्ह्यातील खूनाचे गुन्हे, बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेणे आणि अज्ञात मृतदेहांची ओळख पटवण्यात मोठे यश मिळाले आहे. विशेष म्हणजे खेड तालुक्यातील एका खूनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा तब्बल २० वर्षांनंतर शोध घेण्यात या ‘रेड्स’ ॲपची मोलाची मदत झाली आहे.
दरम्यान, पोलिस दलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या ‘अधिनिर्णय’ या ॲपबाबत सांगताना त्यांनी नमूद केले की, न्यायालयात निकाली निघणाऱ्या केसेस आणि त्यातील न्यायालयाच्या आदेशांची सविस्तर माहिती पोलिसांना सहजरीत्या मिळावी यासाठी हे ॲप अत्यंत उपयुक्त ठरेल. तपासादरम्यान पोलिसांकडून नेमक्या काय चुका झाल्या, याची संक्षिप्त व एका ठराविक फॉरमॅटमध्ये माहिती मिळवणारे हे भारतातील पहिलेच ॲप ठरले आहे. याशिवाय ‘मिशन रॅपिड’ अंतर्गत ‘रत्नसेतू’ चॅटबॉटद्वारे ‘आपले सरकार’ पोर्टलवरील सर्व सेवा नागरिकांना एका दिवसाच्या आत मेसेजद्वारे उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या नव्या तंत्रस्नेही उपक्रमांमुळे पोलिस दलाची कार्यक्षमता वाढण्यासोबतच नागरिकांना मिळणाऱ्या सेवा अधिक पारदर्शक व गतिमान होणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button