
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभचे उद्घाटन ‘स्कील इज फ्युचर’; युवकांनी स्वतःची कौशल्ये अपग्रेड करावीत जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांचे आवाहन
रत्नागिरी, दि. 29 ) : “भविष्यात केवळ पदवी उपयोगी पडणार नसून ‘स्कील’ (कौशल्य) हेच खरे भविष्य ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांनी आपली कौशल्ये सातत्याने अपग्रेड (कौशल्य वृद्धी) करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.
जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभचे उद्घाटन येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले. यानंतर ते उपस्थित तरुण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगत युवकांना प्रेरित केले. एका छोट्या गावातील सामान्य कुटुंबातून ते जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. “सुरुवातीला हिंदी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर इंग्रजीत जुळवून घेताना अपयश आले, मात्र चिकाटी, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर नवीन कौशल्ये शिकत मी पुढे गेलो,” असे सांगत त्यांनी ‘द अॅटोमिक हॅबिट्स’ या पुस्तकाचा संदर्भ देत दररोज केवळ १% प्रगती करत राहिल्यास चक्रवाढ पद्धतीने मोठे यश संपादन करता येते, हे स्पष्ट केले.
फक्त नोकरदार न राहता उद्योजक व्हा
जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “आज विविध कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ किंवा इतर पदांवर नोकरीची सुरुवात करताना केवळ वेतनावर समाधानी न राहता कामातील बारकावे आणि तंत्रज्ञान शिका. डेल (Dell) कंपनीचे उदाहरण देत ते म्हणाले, मायकेल डेल यांनी तंत्रज्ञ म्हणून सुरुवात केली आणि आज शेकडो अब्ज डॉलर्सची कंपनी उभी केली. तसेच प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता ओळखून भविष्यात उद्योग सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. नोकरी करता करता दिवसातील किमान एक तास स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी द्यावा.”
शासकीय योजनांचा लाभ घ्या
तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण येऊ नये म्हणून, शासनाच्या सीएमईजीपी, पीएमईजीपी यांसारख्या अनेक कर्ज आणि अनुदान योजना उपलब्ध आहेत. युवकांनी इंटरनेट व ऑनलाईन माध्यमांचा सकारात्मक वापर करून नवीन ज्ञान आत्मसात करावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक आणि वास्तववादी मार्गदर्शनाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.
कौशल्य आत्मसात करून ‘जॉब क्रिएटर’ बनावे – प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर
“महाविद्यालयीन शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून, विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि रोजगारक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजच्या बदलत्या औद्योगिक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य, तांत्रिक व डिजिटल कौशल्ये, तसेच सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करणे काळाची गरज आहे. केवळ नोकरी शोधणारे न राहता तरुणांनी उद्योग जगताकडे वळून नोकऱ्या देणारे (जॉब क्रिएटर) व्हावे,” असे मार्गदर्शन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.
प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा, विकास आणि युवा सक्षमीकरण या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी तरुणांमधील कल्पकता, कौशल्य आणि उद्योजक वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे.”
या मेळाव्यात सुमारे २३ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची आणि स्वतःमधील क्षमता सादर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्स, नवनिर्मिती आणि स्वयंरोजगार या संकल्पना समजून घेऊन स्वतःच्या उन्नतीसोबतच समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या उपस्थित होत्या.
0000



