लोकमान्य टिळक–मडगाव एक्स्प्रेस तब्बल १३ तास ४५ मिनिटे उशिराने!

खेड : कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांचे वेळापत्रक सातत्याने विस्कळीत होत असल्याने प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे. याचा फटका ११०९९ लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव एक्स्प्रेसच्या प्रवाशांनाही बसला. १५ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी सुटणारी ही गाडी तब्बल १३ तास ४५ मिनिटे उशिराने धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले.
नियोजित वेळेनुसार १५ नोव्हेंबरच्या मध्यरात्री सुटणारी ही गाडी विलंबामुळे १६ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजून ३० मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून रवाना झाली. त्यामुळे प्रवाशांना नियोजित प्रवासासाठी मोठा खोळंबा सहन करावा लागला.
कोकण रेल्वे मार्गावरील गाड्यांच्या वारंवार होणाऱ्या विलंबामुळे प्रवाशांचे नियोजन कोलमडत असून, नोकरी, व्यवसाय, वैद्यकीय उपचार तसेच अन्य महत्त्वाच्या कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, रेल्वेच्या विस्कळीत वेळापत्रकाबाबत प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात असतानाही परिस्थितीत अपेक्षित सुधारणा होत नसल्याची नाराजी व्यक्त होत आहे. प्रवाशांच्या तक्रारींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे का, असा सवालही उपस्थित केला जात आहे.
रेल्वे प्रशासनाने गाड्यांच्या विलंबामागील कारणे स्पष्ट करून वेळापत्रक नियमित ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button