रत्नागिरीच्या घरगुती फराळाचा गोडवा पोहोचला सातासमुद्रापार

डाक विभागाच्या विशेष मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २८ देशांत पाठवला हजार किलोहून अधिक फराळ

रत्नागिरी, दि. १६ ): शिक्षण, नोकरी आणि व्यवसायानिमित्त परदेशात स्थायिक झालेल्या आपल्या लाडक्या आप्तेष्टांना दिवाळीत घरच्या फराळाची उणीव भासू नये, यासाठी रत्नागिरी डाक विभागाने राबविलेल्या विशेष ‘दिवाळी फराळ पार्सल सेवेला’ जिल्ह्यातून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. या मोहिमेअंतर्गत रत्नागिरीतून तब्बल २८ देशांमध्ये १५९ पार्सलद्वारे १,००० किलोहून अधिक खुसखुशीत फराळ पाठवून मायदेशातील मायेची ऊब सातासमुद्रापार पोहोचवण्यात आली आहे.
दिवाळीचा सण जवळ आला की, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना घरच्या लाडू, करंजी आणि चकलीची विशेष ओढ लागते. हीच भावना ओळखून टपाल विभागाने ऑक्टोबर महिन्यापासून ही विशेष सेवा सुरू केली होती. नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रत्नागिरी डाक विभागाने थेट घरपोच ‘पार्सल पिकअप’ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. बुकिंगपासून ते पार्सल परदेशात रवाना होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर विशेष लक्ष ठेवण्यात आल्याने ग्राहकांचा विश्वास अधिक दृढ झाला.
महिनाभरात विक्रमी बुकिंग
१२ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रत्नागिरी विभागातून १५९ आंतरराष्ट्रीय पार्सलचे बुकिंग झाले. प्रत्येक पार्सलचे सरासरी वजन सुमारे ५ किलो इतके होते. विशेष म्हणजे, संपूर्ण जिल्ह्यातून रत्नागिरी आणि राजापूर तालुक्यांतून या उपक्रमाला सर्वाधिक पसंती मिळाली असून, स्थानिक नागरिकांनी यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
अमेरिकेतील भारतीयांना घरच्या चवीची सर्वाधिक ओढ
रत्नागिरीतून पाठवण्यात आलेल्या एकूण पार्सलमध्ये अमेरिकेचा वाटा सर्वाधिक राहिला आहे. प्रमुख देशांनुसार पाठवण्यात आलेल्या पार्सलची आकडेवारी खालीलप्रमाणे आहे:

  • अमेरिका: ५५ पार्सल
  • युनायटेड किंगडम (यूके): २० पार्सल
  • संयुक्त अरब अमिराती (यूएई): १२ पार्सल
  • जर्मनी: १२ पार्सल
  • रशिया आणि कॅनडा: प्रत्येकी १० पार्सल
    डाक विभागाच्या कर्मचाऱ्यांचे नियोजनबद्ध प्रयत्न आणि नागरिकांचा उत्साह यामुळे ही मोहीम यशस्वी ठरली आहे. “परदेशातील भारतीयांपर्यंत त्यांच्या कुटुंबीयांचे प्रेम पोहोचवण्याचे समाधान या उपक्रमातून मिळाले आहे. नागरिकांचा हाच प्रतिसाद लक्षात घेता, भविष्यातही अशाच नावीन्यपूर्ण आणि ग्राहकाभिमुख सेवा अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी विभाग कटिबद्ध राहील. जनतेने या सेवांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा,” असे आवाहन रत्नागिरी डाक विभागाचे अधीक्षक ज्ञानेश कुलकर्णी यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button