
आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
दिवाळीच्या सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठी दापोली तालुक्यात पर्यटकांची गर्दी वाढत असतानाच आंजर्ले समुद्रकिनारी जेलीफिशचा वावर वाढल्याने पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहेसमुद्रात अंघोळीसाठी उतरलेल्या सातारा येथील श्रेया गोरे (वय-१४) या मुलीला जेलीफिशचा स्पर्श झाल्याने त्वचेवर तीव्र खाज आणि जळजळ होण्याचा त्रास झाला. तिला तातडीने आंजर्ले प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून उपचार करण्यात आले.
दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे दापोली तालुक्यातील आंजर्ले, मुरुड, कर्दे, लाडघर आदी समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी रेलचेल सुरू आहे. समुद्राच्या पाण्यात अंघोळ करणे आणि जलक्रीडांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची विशेष पसंती दिसून येत आहे. मात्र, आंजर्ले किनाऱ्यावर जेलीफिशचा वावर वाढल्याने समुद्रात उतरणाऱ्या पर्यटकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.




