
निवृत्तीवेतनधारकांसाठी ‘महाउपलब्धी’ ॲप कार्यशाळा ६ ऑक्टोबरला; ३० सप्टेंबरनंतर कोषागारात थेट केवायसी स्वीकारली जाणार नाही
रत्नागिरी, दि.२९ ): जिल्ह्यातील सर्व राज्य शासकीय व शासन अनुदानित संस्थांमधील निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणाऱ्या ‘महाउपलब्धी’ ॲपच्या प्रभावी वापराबाबत माहिती व मार्गदर्शन करण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा दिनांक ६ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत जिल्हा परिषद, रत्नागिरी येथील श्री शामराव पेजे सभागृहात पार पडणार आहे.
सन २०२३ पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या निवृत्तीवेतनधारकांना केवायसी (KYC) संबंधी माहिती कोषागारात सादर करण्याचे आवाहन यापूर्वी करण्यात आले होते. मात्र, आता निवृत्तीवेतनधारकांनी दिनांक ३० सप्टेंबर २०२६ नंतर केवायसीसंबंधी कोणतीही माहिती कोषागारात थेट आणून जमा करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
केवायसी प्रक्रियेत काही तांत्रिक अडचण उद्भवल्यास संबंधित निवृत्तीवेतनधारकांशी स्वतंत्रपणे संपर्क साधून त्यांना कळवण्यात येईल. तसेच सर्व निवृत्तीवेतनधारकांना त्यांचे दरमहा मिळणारे निवृत्तीवेतन नियमितपणे अदा करण्याची प्रक्रिया कोषागाराकडून सुरळीत सुरू राहील, अशी माहिती जिल्हा कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.




