
“५ हजार कोटी कुठे पाहिले?” रामदास कदमांचा संजय राऊतांवर घणाघाती हल्लाबोल
खेड : शिवसेना नेते रामदास कदम यांनी कथित ५ हजार कोटी रुपयांच्या व्यवहाराच्या आरोपावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. “५ हजार कोटी रुपये कुठे पाहिले? ते मोजले का? त्याचा फोटो किंवा व्हिडिओ आहे का?” असा सवाल करत कदम यांनी राऊतांच्या वक्तव्यांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
संजय राऊत हे केवळ प्रसिद्धीसाठी दररोज नवनवीन वक्तव्ये करतात. त्यांच्या वक्तव्यांना आता महाराष्ट्रात गांभीर्याने घेतले जात नाही, अशी टीकाही रामदास कदम यांनी केली. हवेत तलवार फिरवल्यासारखी वक्तव्ये करण्यापलीकडे राऊतांकडे काहीही नाही, असा टोला त्यांनी लगावला.
दरम्यान, अमित शाह हे उपपंतप्रधान होण्याच्या तयारीत असल्याच्या संजय राऊतांच्या वक्तव्यावरही कदम यांनी प्रतिक्रिया दिली. “समजा अमित शाह उपपंतप्रधान झाले, तर तुमचे काय बिघडते? तुमचे काय नुकसान होणार आहे?” असा सवाल त्यांनी केला.
सत्ता आणि सरकार त्यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची आणि राजकीय परिस्थितीची चिंता करा, असा सल्ला देत कदम यांनी राऊतांना लक्ष्य केले. “तुमच्याकडे काय शिल्लक आहे आणि ते कसे जोडता येईल, हे आधी तुम्ही पाहा,” असा खोचक टोला रामदास कदम यांनी लगावला.
या वक्तव्यामुळे ५ हजार कोटींच्या कथित व्यवहारावरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना पुन्हा एकदा धार आली आहे.




