मुंबई-गोवा महामार्गावर दुचाकीला कारची धडक; पतीचा मृत्यू, पत्नी गंभीर


पालीतील जोशीवाडी येथे अपघात;


रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर पाली येथील जोशीवाडी परिसरात कारने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. सोमवारी (२८ सप्टेंबर) सकाळी साडेअकराच्या सुमारास श्रद्धा सबुरी हॉटेलसमोर हा अपघात झाला.

या अपघातात मनोहर बारी (५२, रा. पाली, रत्नागिरी) यांचा मृत्यू झाला. त्यांची पत्नी मीनल बारी (४७) गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर बारी हे पत्नी मीनल यांच्यासह दुचाकी क्रमांक एमएच ०८ एसी ४९७३ वरून पालीहून रत्नागिरीच्या दिशेने जात होते. जोशीवाडी बसथांब्याजवळील श्रद्धा सबुरी हॉटेलसमोर आले असता कोल्हापूरहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या कार क्रमांक एमएच १४ एलयू ९७६७ ने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली.

धडक इतकी जोरदार होती की मनोहर आणि मीनल बारी हे दोघेही रस्त्यावर कोसळले. दोघांनाही गंभीर दुखापत झाली.

अपघातानंतर कारचालक सुशांत रमेश नेरलेकर (३८, रा. जुना बुधवार पेठ, कोल्हापूर) यांनी तत्काळ जखमी दाम्पत्याला आपल्या कारमधून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मनोहर बारी यांना मृत घोषित केले. मीनल बारी यांच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच हातखंबा वाहतूक मदत केंद्र तसेच रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अपघातप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांकडून पुढील तपास व कायदेशीर कारवाई सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button