बेळगावसह सीमाभाग महाराष्ट्रात घ्या; रामदास कदमांची पंतप्रधानांकडे मागणी

खेड : बेळगावसह सीमाभागातील मराठी भाषिक प्रदेश महाराष्ट्रात समाविष्ट करावेत, अशी जोरदार मागणी शिवसेना नेते रामदास कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. बेळगाव, कारवार, धारवाड, हुबळी आणि निपाणी परिसरातील सुमारे ४० लाख मराठी भाषिकांवर अन्याय होत असल्याचा दावा कदम यांनी केला.
सीमाभागातील मराठी भाषिकांना त्यांच्या भाषेच्या वापरासह शिक्षण आणि दैनंदिन व्यवहारात विविध अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे रामदास कदम यांनी सांगितले. मराठी शाळा, मराठी शिक्षक तसेच मराठी भाषेतील पाट्यांबाबत कर्नाटक सरकारकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

सीमाप्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना सीमाभागातील मराठी भाषिकांच्या प्रश्नांकडे केंद्र सरकारने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे कदम यांनी म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नात वैयक्तिक लक्ष घालून सीमाभागातील मराठी भाषिकांना न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. या मागणीसंदर्भात पंतप्रधानांना पत्र देणार असल्याचेही रामदास कदम यांनी स्पष्ट केले.
बेळगावसह मराठीबहुल सीमाभाग महाराष्ट्रात समाविष्ट करण्याच्या मागणीला पुन्हा एकदा राजकीय वाचा फोडल्याने सीमाप्रश्नावरून महाराष्ट्र-कर्नाटकातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button