भारतीय महिला हॉकी संघाने जपानमध्ये इतिहास घडवला; ४४ वर्षांनंतर सुवर्णपदकावर कोरलं नाव!

India vs China Womens Hockey Final : आशियाई क्रीडा स्पर्धेतील महिला हॉकीचा फायनलचा सामना भारत आणि चीन या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गतविजेत्या चीनला गोल्ड मेडलसाठी प्रबळ दावेदार मानलं जात होतं.

पण भारतीय खेळाडूंनी सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत मजबूत पकड बनवून ठेवली आणि ४४ वर्षांनंतर भारताला आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकून दिलं. या विजयासह भारतीय महिला संघ २०२८ मध्ये लॉस एंजिलिसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. तर गेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडलविजेत्या चीनला या स्पर्धेत सिल्व्हर मेलडवर समाधान मानावं लागलं आहे.

भारतीय संघाची दमदार सुरूवात

या सामन्यातील पहिल्या क्वार्टरपासूनच भारताने चीनवर हल्ला चढवला. या सामन्यातील सहाव्या मिनिटाला बलजीत कौरला ग्रीन कार्ड मिळालं. पण तरीदेखील भारतीय खेळाडूंनी आक्रमक खेळ सुरूच ठेवला. दरम्यान भारतासाठी २०० वा आंतरराष्ट्रीय सामना खेळत असलेल्या लालरेमसियामीने पहिल्या क्वार्टरमधील १० व्या मिनिटाला पहिला गोल केला. हा या संपूर्ण सामन्यातील पहिला आणि एकमेव गोल ठरला. त्यानंतर चीनच्या खेळाडूंनी एकापाठोपाठ एक हल्ले केले. पण भारताच्या गोलकिपरने एकही गोल होऊ दिला नाही.

पहिल्या क्वार्टरमध्ये पिछाडीवर राहिलेल्या चीनने दुसऱ्या क्वार्टरमध्ये आक्रमक खेळ करून दमदार पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान चीनला पेनल्टी स्ट्रोक मिळाला. त्यावेळी चीनकडे बरोबरी करण्याची सुवर्णसंधी होती. पण सविता पुनियाने डाव्या बाजूला डाईव्ह मारून वेगवान गोल अडवला आणि चीनचं बरोबरी करण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्यानंतरही एकापाठोपाठ एक हल्ले सुरूच होते, पण गोल काही होत नव्हते. दुसऱ्या क्वार्टरमध्ये चीनने आक्रमक खेळ केला, तर भारतीय संघाकडून रक्षात्मक खेळ पाहायला मिळाला.

४४ वर्षांनंतर भारताला पहिलं गोल्ड

भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेतील एकमात्र गोल्ड मेडल १९८२ मध्ये पटकावलं होतं. त्यावेळी महिला हॉकी संघाला पहिल्यांदा या स्पर्धेत प्रवेश दिला गेला होता. त्यानंतर १९९८ मध्ये भारतीय महिला संघाने फायनलमध्ये प्रवेश केला होता. या सामन्यात भारतीय महिला संघाला दक्षिण कोरियाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यानंतर २०१८ मध्ये भारतीय संघाला जपानकडून पराभूत होऊन सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. पण आता ४४ वर्षांनंतर भारतीय महिला संघाने चीनवर दमदार विजय मिळवून गोल्ड मेडलवर नाव कोरलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button