
खा. सुनिल तटकरे यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे अडीच कोटींच्या कामांना तातडीने वर्क ऑर्डर !
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार सुनिल तटकर यांनी घेतलेली आक्रमक भूमिका आणि त्यानंतर अवघ्या काही तासांत फिरलेली सूत्रे यामुळे सध्या जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. आपल्या मतदारसंघातील विकासकामांच्या वर्क ऑर्डर रोखून धरल्याचा थेट आरोप करीत खासदार तटकरेंनी प्रशासनाला धारेवर धरले. महायुतीतील दोन वजनदार नेत्यांमध्ये या मुद्द्यावरून बैठक चांगलीच तापली असताना, पालकमंत्री उदय सामंत यांनी आठ दिवसांत निर्णय घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, दिलेली मुदत संपण्याची वाट न पाहाताच बैठकीच्या दिवशीच खेड तालुक्यातील सुमारे अडीच कोटी रुपयांच्या कामांना तातडीने कार्यारंभआदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आले आहेत.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार सुनिल तटकरे यांनी विकासकामांच्या मंजुरीचा मुद्दा अतिशय जोरकसपणे मांडला. निधी उपलब्ध असून आणि प्रशासकीय मंजुरी मिळालेली असतानाही प्रत्यक्ष कामांचे कार्यारंभ आदेश का रोखले जात आहेत, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. विकासाच्या कामांमध्ये अडथळे आणले जात असतील तर त्याची जबाबदारी कुणाची, असा प्रश्न विचारत त्यांनी प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले. यामुळे बैठकीतील वातावरण काही काळ कमालीचे तापले होते.




