कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेची डॉ. उदय सामंत यांच्याकडून उद्घोषणा

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आयोजित कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या स्पर्धेची उद्घोषणा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त डॉ. उदय सामंत यांनी केली. गतवर्षी प्रमाणेच रत्नागिरी तालुक्यासाठी मर्यादित असलेली ही स्पर्धा या वर्षीही मोठ्या उत्साहात आयोजित करत असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले. या वर्षीची स्पर्धा १ ऑक्टोबर २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२७ या कालावधीत चालणार असल्याचे देखील त्यांनी घोषित केले.
कै. नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धेच्या यंदाच्या उत्सवी मोसमातील म्हणजे २०२६ – २०२७ च्या स्पर्धेची उद्घोषणा त्यांनी यावेळी केली. गतवर्षी या स्पर्धेला संपूर्ण रत्नागिरी तालुक्यातून अभूतपूर्व असा प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत एकूण ५७ नाटकांचे प्रत्यक्ष सादरीकरण झाले. या स्पर्धेची सुधारित नियमावली आणि प्रवेश अर्ज उपलब्ध झाले आहेत.
जास्तीत जास्त उत्सव मंडळांनी उत्सवासाठी निर्मित केलेले नाटक हे या स्पर्धेत सादर करावेच, असे आवाहन करत लोककले पाठोपाठ नाट्यकला ही देखील इथल्या संस्कृतीचा भाग असून आपण तो वारसा जपत आहोत, असे उद्गगार डॉ. उदय सामंत यांनी या स्पर्धेबाबत काढले. स्पर्धेची संकल्पना व्यक्त करत असताना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे विश्वस्त या नात्याने त्यांनी गतवर्षी सहभागी झालेल्या सर्व रंगकर्मींचे कौतुक केले आहे.
या स्पर्धेतील स्पर्धक संघांसाठी आणि कलाकारांसाठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने दिले जाणारे बक्षीसे पुढील प्रमाणे आहेत. सांघिक – तीन, सांघिक उत्तेजनार्थ – दहा, विशेष लक्षवेधी नाटक – एक, पुरुष अभिनय/स्त्री अभिनय, (व्यावसायिक)/स्त्री अभिनय, (हौशी)/विनोदी अभिनय/पार्श्वसंगीत/प्रकाशयोजना/नेपथ्य/रंगभूषा-वेशभूषा प्रत्येकी तीन तसेच स्थानिक लेखक प्रोत्साहनपर -पाच, बालकलाकार प्रोत्साहनपर -तीन, प्रत्येक नाटकातील एक लक्षवेधी अभिनेता.
स्पर्धा प्रमुख म्हणून संतोष सनगरे काम बघणार असून मुख्य समन्वयक म्हणून श्रीकांत भाटवडेकर आणि विजय पोकळे हे जबाबदारी सांभाळणार आहेत. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी संतोष सनगरे (९४२११८६०७८), अमेय धोपटकर (८८८८०३३६२१) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष समीर इंदुलकर यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button