
वादळी पावसाने सावर्डे परिसर झोडपलाखेड–मंडणगड मार्ग बंद; झाडे कोसळून वाहतूक विस्कळीत
चिपळूण : सावर्डे परिसरात शनिवारी संध्याकाळच्या सुमारास अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसासह सोसाट्याच्या वाऱ्यामुळे परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटाने वातावरण दणाणून गेले होते. काही ठिकाणी किरकोळ पडझडीच्या घटना घडल्या असून झाडे उन्मळून पडल्याची नोंद आहे.
वादळी पावसाचा फटका खेड–मंडणगड मार्गालाही बसला. दुपारपासूनच रस्त्यावर झाडे कोसळल्याने वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे अनेक वाहने रस्त्यात अडकून पडली. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाकडून रस्ता मोकळा करण्याचे काम हाती घेण्यात आले.
अचानक आलेल्या पावसामुळे परिसरातील क्रिकेट स्पर्धा तसेच लग्न समारंभांमध्येही व्यत्यय निर्माण झाला. दरम्यान, जोरदार वाऱ्यामुळे आंबा बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर येत असून बागायतदारांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.




