
फाटक हायस्कूलच्या नवेली भिंगार्डेचा १०० टक्के गुणांचा विक्रम
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेच्या निकालात कोकण विभागाने यंदाही आपला दबदबा कायम ठेवला असून, रत्नागिरीतील विद्यार्थिनी नवेली सचिन भिंगार्डे हिने १०० टक्के गुण मिळवत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिच्या या दैदिप्यमान यशामुळे जिल्हाभरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दहावीच्या अत्यंत महत्त्वाच्या वर्षात नवेलीने सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध अभ्यासावर भर दिला. मोबाईल आणि सोशल मीडियापासून दूर राहत तिने पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित केले. सातत्यपूर्ण मेहनत, शिस्तबद्ध दिनक्रम आणि जिद्दीच्या जोरावर तिने हे अभूतपूर्व यश संपादन केले. निकाल जाहीर होताच नवेली आणि तिच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला.
नवेलीचा शैक्षणिक प्रवासही तितकाच उल्लेखनीय राहिला आहे. इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंतचे शिक्षण तिने लांजा येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर इयत्ता नववी आणि दहावीचे शिक्षण रत्नागिरीतील नामांकित फाटक हायस्कूलमध्ये घेतले. शिक्षकांचे मार्गदर्शन, शाळेतील पोषक वातावरण आणि स्वतःची मेहनत यामुळेच तिला हे यश मिळवता आले.
नवेलीच्या यशानंतर तिचे वडील सचिन भिंगार्डे आणि आई सारंगी भिंगार्डे यांनी पेढा भरवून तिचे अभिनंदन केले. सचिन भिंगार्डे हे रत्नागिरीतील बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून, रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक म्हणूनही कार्यरत आहेत.
नवेली भिंगार्डे हिच्या शंभर नंबरी यशामुळे रत्नागिरीच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले असून, विविध सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांकडून तिचे कौतुक करण्यात येत आहे. तिचे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.




