
चिपळूण शहरातील ’त्या’ सीएनजी पंपावर मुख्याधिकार्यांचे कारवाईचे संकेत
चिपळूण शहरातील शिवाजीनगर येथील सीएनजी पंपावरील कॉम्प्रेसरमधून होणार्या तीव्र आवाजामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी पुन्हा एकदा चिपळूण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेत या समस्येवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी नगरसेविका अंजली कदम, पत्रकार सतीश कदम तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते.
गेल्या २०२२ पासून या प्रश्नाबाबत विविध शासकीय विभागांना देण्यात आलेल्या पत्रव्यवहाराचा अहवाल नागरिकांनी मुख्याधिकार्यांसमोर मांडला. यावर मुख्याधिकारी संजय जाधव यांनी सकारात्मक भूमिका घेत, न. प.ची या प्रकरणात संपर्क अधिकारी म्हणून मर्यादित जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले. या विषयात थेट कारवाईचे अधिकार न.प. कडे नसले तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पालिकेला दिलेल्या पत्रानुसार पुढील प्रक्रिया राबविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून करण्यात येणार्या तपासणीत आवाजाची तीव्रता निर्धारित मर्यादपेक्षा अधिक आढळल्यास लवकरच संबंधित नियमांनुसार चिपळुण पोलीसांत गुन्हा नोंद करून पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अभी माहितीही त्यांनी शिष्टमंडळाला दिली.www.konkantoday.com




