
मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात केमिकल टँकरचा भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटात गुरुवारी दुपारी केमिकल्सने भरलेल्या टँकरचा भीषण अपघात होऊन चालकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी सुमारे एकच्या सुमारास परशुराम घाट उतरत असताना टँकरवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर टँकरचा भीषण अपघात झाला. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की चालक वाहनाखाली अडकून जागीच ठार झाला. तसेच टँकरचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासन आणि चिपळूण नगर परिषदेचे अग्निशामक दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बचाव आणि मदतकार्य हाती घेत परिसर सुरक्षित करण्यात आला. अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
दरम्यान, पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा करण्यात येत असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.




