ऑनलाईन टास्कच्या आमिषाने महिलेची १०.३१ लाखांची फसवणूक; रत्नागिरीत गुन्हा दाखल


रत्नागिरी : सोशल मीडियावरील आकर्षक जाहिरातीच्या आमिषाला बळी पडलेल्या एका महिलेला ऑनलाईन फसवणुकीचा मोठा फटका बसला आहे. मिरजोळे येथील सौ. सई प्रथमेश बांडावे (वय ३७) यांची अज्ञात सायबर भामट्यांनी तब्बल १० लाख ३१ हजार २०९ रुपये उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका जाहिरातीवर विश्वास ठेवून संबंधित महिलेने संपर्क साधला. त्यानंतर भामट्यांनी विविध ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास मोठा आर्थिक परतावा मिळेल, असे आमिष दाखवत वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यांमध्ये पैसे भरण्यास सांगितले. अधिक नफा मिळण्याच्या आशेने महिलेने टप्प्याटप्प्याने एकूण १० लाख ३१ हजार २०९ रुपये जमा केले.

मात्र, त्यानंतर कोणताही परतावा न मिळाल्याने आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात सायबर भामट्यांविरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.

दरम्यान, नागरिकांनी सोशल मीडियावरील आकर्षक जाहिराती, गुंतवणूक किंवा ऑनलाईन टास्कच्या आमिषांना बळी पडू नये तसेच कोणतीही रक्कम भरण्यापूर्वी संबंधित बाबींची खातरजमा करावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button