
कोंबड्यांच्या खोलीचा दरवाजा उघडताच बिबट्याची थेट महिलेवर झेप
संगमेश्वर तालुक्यातील कोंडये सुवरेवाडी येथे अंगावर काटा आणणारी घटना घडली आली आहे. कोंबड्यांच्या खोलीत रात्रभर दबा धरून बसलेल्या एका बिबट्याने दुसर्या दिवशी दुपारी दरवाजा उघडताच थेट बाहेर झेप घेतली. या अचानक झालेल्या हल्ल्यात बिबट्याचे नख मीना धोंडू सुवरे यांच्या चेहर्याला लागल्याने त्या जखमी झाल्या आहेत.
सुदैवाने मीना सुवरे यांचा जीव बालबाल वाचला असून, या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. सुवरे यांच्या घराशेजारीच कोंबड्यांसाठी एक भक्कम चिरेबंदी खोली बांधण्यात आली आहे. नेहमीच्या सवयीनुसार संध्याकाळी अंधार पडल्यानंतर कोंबड्या स्वतःहून या खोलीत जातात आणि त्यानंतर घरातील मंडळी दरवाजा बंद करतात. घटनेच्या दिवशी संध्याकाळी दरवाजा बंद करण्यापूर्वीच एक बिबट्या छुप्या मार्गाने या खोलीत शिरला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. बिबट्या आत असल्याचे लक्षात न आल्याने घरातील सदस्यांनी नेहमीप्रमाणे बाहेरून दरवाजा लावून घेतला. त्यामुळे बिबट्या रात्रभर त्या चिरेबंदी खोलीतच बंदिस्त राहिला. रात्रभराच्या या मुक्कामात बिबट्याने खोलीतील सर्व कोंबड्यांच्या रक्तावर ताव मारला यात कोंबड्या ठार झाल्या.




