
ना. उदय सामंत ह्यांच्या मागणीला मोठे यश
कोकणातील लोककलांचा शासन यादी मध्ये समावेश करण्याची मागणी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी शासनाकडे केली होती. त्यांच्या ह्या मागणीला शासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला असून त्याबद्दल आज विधिमंडळ अधिवेशनामध्ये सरकार कडून अधिकृत घोषणा करण्यात आली.
‘नमन खेळ’ आणि ‘जाखडी’ हे केवळ कलाप्रकार नसून ती आपल्या कोकणच्या संस्कृतीची, मातीची आणि लोकजीवनाची खरी ओळख आहेत. या लोककला टिकवून ठेवण्यासाठी आणि आपल्या कलाकारांना हक्काचे पाठबळ मिळवून देण्यासाठी मी सातत्याने पाठपुरावा करत होतो. माझ्या मागणीचा सकारात्मक विचार करून राज्य सरकारने एक अत्यंत ऐतिहासिक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
कोकणातील नमन खेळ हा कलाप्रकार सादर करणाऱ्या २० लोककला पथकांना प्रतिवर्षी ₹ 50 हजार चे अनुदान दिले जाणार असून, जाखडी कलाप्रकार सादर करणाऱ्या प्रत्येक कलापथकाला प्रतिवर्षी ₹ 50 हजार चे आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे. या निर्णयासोबतच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैविध्याचा आदर करत विदर्भातील ‘झाडीपट्टी’ आणि खान्देशातील ‘वहीगायन’ या पारंपरिक लोककलाप्रकारांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
माझी मागणी मान्य करत, महाराष्ट्राच्या या पारंपरिक लोककलांचा गौरव करत कलाकारांना हा मोठा न्याय मिळवून दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा.श्री.एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा.श्रीमती सुनेत्राताई पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री मा. श्री. आशिष शेलार यांचे मी मनापासून आभार मानतो.
आपले महायुती सरकार महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचे जतन करण्यासाठी सदैव कटिबद्ध असल्याचे यातून अधोरेखित झाले आहे, असे यावेळी मा. ना. उदयजी सामंत ह्यांनी म्हटले.




